
सामना प्रतिनिधी । नांदेड
बँक लुटण्याच्या तयारीत आहेत म्हणून ऑक्टोबर २०१८ मधील पोलिसांनी तीन आरोपींना केलेल्या मारहाण प्रकरणात नांदेडच्या मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्या समवेत असलेल्या कर्मचार्यांवर फौजदारी खटला दाखल केला असून, या खटल्याची पुढील सुनावणी २० मे २०१९ रोजी निश्चित करण्यात आली आहे.
१५ ऑक्टोबर २०१८ रोजी मल्टीपर्पज हायस्कूलजवळील गोदावरी अर्बन बँक लुटण्याच्या तयारीत असलेल्या जगदिशसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंघ संधू, करणसिंघ उर्फ किरण किशनसिंघ बावरी, राहुल सुभाष ठाकूर यांना पकडले होते. स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यांना १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर यात आणखी एका आरोपीची वाढ झाली. तो मनप्रितसिंघ उर्फ सोनू सुजानसिंघ औलख असे त्याचे नाव आहे. या चौघांचीही पोलीस कोठडी नंतर वाढविण्यात आली.
आरोपी संधू, बावरी, औलख या तिघांनी यासंदर्भात आपल्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली, आम्हाला घरातून बोलावून आमच्या गाडीत दोन बंदूक व दोन काडतूस स्वतः ठेवले आणि घटनास्थळी आणून आमच्यावर गुन्हा दाखल केला. जगदीशसिंघ व करणसिंघ यांना पाच ते सहा तास मारहाण केल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आली. पोलिसांनी केलेली मारहाण ही जबर होती, त्यांनी पाठीवर, हातावर, पोटावर मारहाण केल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याबाबत करणसिंघ बावरी यांनी सदर मारहाणीच्या संदर्भात न्यायालयासमोर जबाब देताना आपल्याला पोलीस परेड ग्राऊंडवर नेवून एक पिस्तूल दाखवले आणि ते माझे आहे असे सांगितले. आणि तेथेच मला मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे माझ्या डोक्यावर देखील पिस्तूल लावली. त्या रात्री म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी नंतर मी निघून गेलो आणि १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास विनोद दिघोरे व जसवंतसिंघ शाहू यांनी मला कौठा येथे पकडले. तेथून पोलीस परेड ग्राऊंडच्या मैदानावर नेऊन मला भरपूर मारहाण केली. आणि रात्री साडेबाराच्या सुमारास वजिराबाद पोलीस कोठडीत नेवून टाकले. न्यायालयाने यासंदर्भाची वैद्यकीय प्रमाणपत्रे, गुप्तपणे आलेला वैद्यकीय अहवाल या सर्वांचा अभ्यास करुन मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी आपल्या अहवालासह सदर प्रकरण नांदेडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशाकडे पाठविले. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी पूर्ण कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर व दिलेल्या आदेशानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी रविंद्र करंकाळ यांनी २४ एप्रिल रोजी या प्रकरणात नियमित फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले. प्राथमिकदृष्ट्या जगदिशसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंघ संधू, करणसिंघ उर्फ किरण किशनसिंघ बावरी, मनप्रितसिंघ उर्फ सोनू औलख या तिघांना मारहाण झाली असल्याने स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जसवंतसिंघ उर्फ जसू हजूरासिंघ शाहू, वजिराबादचे पोलीस उपनिरीक्षक किरण पठारे, पोलीस निरीक्षक संदीप शिवले आणि वजिराबादच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी जसपालसिंघ कालो या पाच जणांविरुध्द हा नियमित दिवाणी खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

































































