
उत्तुंग इमारतींमध्ये लागणाऱया आगी विझविण्याचे आव्हान ठरत असल्यामुळे यापुढे दरवर्षी सोसायटीच्या रजिस्टेशनचे नूतनीकरण करताना फायर ऑडिट रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत उत्तुंग इमारतींमध्ये लागलेल्या आगींमध्ये संबंधित ठिकाणी अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे समोर आल्याने पालिकेने याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत रजिस्टार ऑफ को-ऑपरेटिंग सोसायटी यांना नियमात तरतूद करण्याबाबत पालिकेने पत्र दिले असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.
मुंबईत 12 ते 15 माळय़ांहून जास्त मजले असलेल्या पाच हजारांवर सोसायटय़ा आहेत. गेल्या दहा वर्षांची सरासरी आकडेवारी पाहता मुंबईत उत्तुंग इमारतींत आगी लागल्याच्या सुमारे 1500 हून जास्त दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये 39 टक्क्यांहून जास्त इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून उत्तुंग इमारत मालक-भोगवटाधारकांना इमारतीत अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवण्याचे आवाहन केले जाते. दुर्घटनेत अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे समोर आल्यास नोटीस देऊन कारवाईदेखील केली जाते, मात्र सोसायटय़ांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट करून ऑनलाइन अॅपवर रिपोर्ट सादर करणेही बंधनकारक केले आहे. यामध्ये आता आणखी खबरदारी घेण्यासाठी रजिस्टेशन रिनिव्हल करताना फायर ऑडिट रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
‘तय्यारी, आग से जितने की!’
n मुंबईत अग्निशमन दलाच्या माध्यमातून उत्तुंग इमारतींमध्ये राहणाऱया रहिवाशांनाही अग्निसुरक्षेचे विशेष ट्रेनिंग मिळणार आहे. यामध्ये आग लागलीच तर कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा, अग्निशमन दलाला कसे बोलवावे याचे धडे दिले जातील.
n ‘तय्यारी आग से जितने की’ या उपक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी पालिकेच्या फायर ब्रिगेडकडून परवानगीही मिळाली असल्याची माहिती महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी दिली. महिनाभरात हे ट्रेनिंग सुरू होईल.
रजिस्टार ऑफ को-ऑपरेटिव्हच्या कायद्यात सध्या फायर ऑडिट बंधनकारक नाही. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट करून सोसायटीचे रजिस्टेशन दरवर्षी रिनिव्हल करताना अग्निसुरक्षा सक्षम असल्याबाबतचा ’फॉर्म बी’ सादर करणे बंधनकारक करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
n हेमंत परब,
प्रमुख अग्निशमन दल अधिकारी


























































