बीडमधील सह्याद्री देवराईला पुन्हा आग; सयाजी शिंदे संतापले, अजित पवारांची भेट घेणार

अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीडमध्ये उभारलेल्या सह्याद्री देवराईला शुक्रवारी पुन्हा एकदा आग लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांतली ही दुसरी घटना आहे. या घटनेवर सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून यासंदर्भात आपण लवकरच पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्री देवराईला पहिल्यांदा आग लावली तेव्हा शंभर ते दीडशे झाडे जळाली. आता पुन्हा एकदा आग लावण्यात आली असून सात वर्षांपूर्वी लावलेली झाडे जाळण्यात आली आहेत. दिवसाढवळय़ा तीन ठिकाणी आग लावण्यात आल्याचे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे. बीडमध्ये आधीच वनक्षेत्र कमी आहे, अशा परिस्थितीत कष्टाने उभी केलेली वनराई जाळली जाणे दुर्दैवी आहे. आमची माणसे आणि वन विभागाचे अधिकारीही तेथे काम करत आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा बसला पाहिजे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एकदा देवराई परिसरात आग लागल्याची घटना घडल्यानंतर वन विभागासह सयाजी शिंदे यांच्या बीडमधील शिष्टमंडळाने देवराई प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगण्यात आला. याच प्रकल्प परिसरात सीसीटीव्ही लावण्यासाठी या शिष्टमंडळाने प्रशासनासोबत चर्चादेखील केली आहे.