
संयुक्त अरब अमिरातीच्या अजमान येथील एका निवासी इमारतीला सोमवारी रात्री भीषण आग लागली. काही वेळातच ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अजमान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग ‘अजमान वन कॉम्प्लेक्स’च्या टॉवर-2 ला लागली आहे. दरम्यान अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलीसांच्या मोठ्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत कोणीही जखमी झाले नाही.
दरम्यान या आगीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. यामध्ये एक बहुमजली इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढलेली दिसत आहे. इमारतीवरून खाली पडणारा ढिगाराही यात स्पष्ट दिसत आहे. तसेच इमारतीमधून धुराचे लोट निघत असल्याचे दिसून येत आहे.


























































