
कोरोनाचा फटका फटाके व्यवसायालाही बसला असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा 50 टक्केही विक्री झाली नसल्याचे येथील फटाके व्यावसायीकांच्या बोलण्यातून निदर्शनास आले आहे. लहान मुलांना सहज फोडता येतील अशाच फटाक्यांची किरकोळ स्वरुपात विक्री होत आहे.
गावच्या जत्रा, धार्मिक उत्सव, दिवाळी, लग्नसमारंभावेळी फटाक्यांची आतषबाजी करून सर्वजण आपला आनंद द्विगुणीत करीत असतात. परंतु गणेशोत्सवाला घरोघरी फटाक्यांची आतषबाजी दिसून येते. विसर्जन मिरवणुकीला तर याचे प्रमाण नेहमी वाढतच असते. आकाशात जाऊन विविध रंगानी फुटणारे आकर्षक फटाके घेण्याकडे गणेशभक्तांचा कल जास्त असतो. दरवर्षी गणेशभक्त अशा फटाक्यांसाठी हजारो रुपये खर्च करतात. मात्र,यावर्षी कोरोनाची झळ या फटाके व्यवसायालाही बसली आहे.
फटाके व्यावसायीकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांची दुकाने मांडली आहेत. पण सध्या फटाके खरेदी करणाऱयांची संख्या फारच कमी असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे आधीच सर्वांची आर्थिक बाजू कठिण झाल्याने गणेशोत्सव साजरा करताना खर्चावरही मर्यादा आल्या आहेत. गणेशोत्सवात नेहमी फटकांच्या दुकानावर दिसणारी गर्दी यंदा अपवादात्मकच दिसत आहे. त्यामुळे या व्यवसायावरही गदा आली आहे.






























































