दिल्लीत अग्नितांडव, 43 जण होरपळले; 15 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीत रविवारी पहाटे भीषण अग्नितांडवाने प्रचंड हाहाकार उडाला. धान्य बाजार परिसरातील कारखान्याला आग लागून 43 कामगारांचा मृत्यू, तर 15 जण जखमी झाले. कामगार गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या तातडीच्या बचावकार्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले. पोलिसांनी इमारत मालक रेहानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून 3.5 किमीवर राणी झांसी रोडवरील चार माळ्याच्या इमारतीत पहाटे 5.22 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. कारखान्यात स्कूल बॅग आणि खेळणी बनवली जात होती. मोठय़ा प्रमाणावरील प्लास्टिकच्या सामानामुळे आगीच्या भडक्याबरोबरच आसपास धूराचे मोठे साम्राज्य पसरले होते. मृतांपैकी बहुतांशजण बिहार आणि उत्तर प्रदेशचे कामगार आहेत. अनेकांचा धुरात गुदमरून मृत्यू झाला. शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. धान्य बाजारसह जुन्या दिल्लीतील फिल्मिस्तान, सकरी गल्ली आदी परिसरांत दाटीवाटीच्या घरांमध्ये अग्निशमन दलाच्या परवानग्या न घेता कारखाने चालवले जाताहेत. रविवारचे अग्नितांडवही बेकायदा गोष्टींमुळेच घडल्याचे बोलले जात आहे.  

‘देवदूत’ राजेश शुक्लाने 11 जणांना वाचवले

आगडोंब उसळलेला असतानाच कारखान्यात पहिल्यांदा घुसण्याचे धाडस अग्निशमन दलाचा जवान राजेश शुक्लाने केले. बचाव कार्यात हातापायांना गंभीर इजा होऊनही त्यांनी 11 जणांना वाचवले. या ‘देवदूता’ला सलाम, अशा शब्दांत दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह अनेकांनी शुक्ला यांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केले.  

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 19 लाखांची मदत

केंद्रासह दिल्ली व बिहार सरकार तसेच भाजपाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एकूण 19 लाखांच्या मदतीची घोषणा केली गेली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना एक लाखाच्या मदतीची घोषणा केली. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्येकी दोन लाखांची, तर दिल्ली भाजपाने प्रत्येकी 5 लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली.  

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

आगीची दुर्घटना भयंकर असल्याचे ट्विट करीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त केला. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत चौकशीचा आदेश देऊन सात दिवसांत अहवाल मागितला आहे.

राजधानीत 22 वर्षांनंतर घडलेले हे भीषण अग्नितांडव आहे. याआधी 13 जून 1997 रोजी उपहार सिनेमामध्ये चित्रपट सुरू असतानाच आग लागून त्यात 59 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते.