
मालवण नगरपालिकेसमोरील वझे कंपाऊंड येथे मुख्य वीजवाहिनी (11 केव्ही) तुटून पडल्याने आग लागली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानीटळली आहे. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत यांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज वितरणला माहिती देत शहराचा वीज पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मुख्य वीज वाहिनी तुटल्याने त्यातून ज्वाला निघत असल्याने आग लागली होती. त्यामुळे मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती.
वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वीज वाहिनीतून येणाऱ्या ज्वाळा थांबल्या आणि आग नियंत्रणात आणण्यात आली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वझे कंपाऊंडजवळ ही घटना घडली. परिसरात वर्दळ नसल्याने जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी पावसाला सुरुवात झाल्याने कामात अडथळा आला. मात्र, कर्मचाऱ्यांनी वीजवाहिनीच्या जोडणीचे काम पूर्ण करत वीज पूरवठा सुरळीत केला.



























































