
सामना ऑनलाईन, मुंबई
कुर्ला स्थानकाच्या सिग्नल केबिनमध्ये काही वर्षांपूर्वी लागलेल्या भयानक आगीमुळे दोन दिवस मध्य रेल्वे ठप्प झाली होती. या घटनेतून धडा घेत मध्य रेल्वेने मुंबईत आगीच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर दादर येथील नव्या आधुनिक आरआरआय पॅनलमध्ये (रूट रिले इंटरलॉकिंग सिग्नल केबिन) प्रथमच कार्बन गॅसवर आधारित फायर फायटिंग यंत्रणा वापरण्यात आली आहे. हे आरआरआय पॅनल सोमवारपासूनच कार्यरत झाले आहे.
सहा वर्षांपूर्वी 18 एप्रिल 2012 मध्ये कुर्ला-विद्याविहार स्थानकांदरम्यानच्या सिग्नल केबिनला प्रचंड मोठी आग लागून दोन दिवस मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे 68 सिग्नल बंद पडून 18 एप्रिल रोजी मध्य रेल्वेला केवळ 70 टक्के गाडय़ाच चालवण्यास यश आले होते. आरआरआय सिग्नल यंत्रणा तयार करताना भरपूर वेळ लागतो. मागे इटारसी आरआरआयला आग लागल्याने रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना फटका बसून कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडाला होता.
गॅस आधारित फायर फायटिंग म्हणजे काय?
सामान्यतः फायर फायटिंग उपकरणात धुराने वा उष्णतेने अलार्म वाजून पाण्याचा फवारा सुरू होतो, मात्र या यंत्रणेत पाण्याऐवजी स्वयंचलितपणे नॉन टॉक्सिक गॅसचा फवारा मारला जाऊन आग पसरण्यापूर्वीच आटोक्यात आणण्यात येते. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात बसविलेल्या सिग्नल पॅनल केबिनमधून परळ ते शीव टप्प्यातील सर्व सिग्नल नियंत्रित होणार आहेत. येथे 43 मेन सिग्नल असून 22 शंट सिग्नल, 52 पॉइंट मशीन आणि 96 ट्रक सर्किट आहेत. अप मार्गावर एक नवा सिग्नल बसविला गेल्याने अप दिशेच्या दोन लोकलमधील वेळ कमी होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये प्रथमच अशी यंत्रणा वापरण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई ते सातारा इतक्या अंतराची केबल
एखाद्या टेलिफोन एक्स्चेंजसारखे सिग्नल पॅनलच्या वायरी दिसत असून दादर पॅनलसाठी वापरलेल्या केबलची गुंतागुंत प्रचंड मोठी असून तिची एकूण लांबी मोजल्यास ती जवळपास मुंबई ते सातारा इतके अंतर भरेल अशी अडीचशे कि.मी. अंतराची केबल वापरण्यात आली आहे.


























































