फटाक्याच्या आतीषबाजीने रस्त्यावरील दोन मोटार जळून खाक

लग्न समारंभात फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे लॉन्सच्या बाहेर पार्किंग केलेल्या दोन मोटार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी दुपारी पुण्याजवळील पौड रस्त्यावरील एका विवाह कार्यालयानजीक घडली. त्यानंतर पीएमआरडीए अग्निशामक जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पौड परिसरातील चालेगाव येथे सुभद्रा लॉन्समध्ये रविवारी दुपारी विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे लग्नाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. काही नागरिकांनी त्यांची वाहने लॉन्सच्या बाहेरील परिसरात पार्क केली होती. लग्नानंतर फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरील दोन मोटारींना आग लागली. अवघ्या काही वेळात मोटारींनी पेट घेतल्याने नागरिकांनी पीएमआरडीए अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशामक जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोन कार आगीच्या विळख्यात सापडल्या होत्या. तर, दुसऱ्या दोन कारनेही पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करून अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. लग्न समारंभातच अचानक घडलेल्या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. आजूबाजूला लावलेली वाहने काढण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली होती. फटाक्यांमुळे आग लागल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या