पार्श्वभागात फटाके खुपसून पेटवले, कोंबडीचा वेदनादायक मृत्यू

स्वत:च्या क्षणिक आनंदासाठी मुक्या प्राण्यांना वेठीस धरणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. अशीच एक घटना आसामच्या नागाव जिल्ह्यातून समोर आली आहे. नागाव जिल्ह्यातील राहा गावामध्ये चार मुलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. या तरुणांनी कोंबडीच्या पार्श्वभागात फटाके खूपसून ते पेटवले, ज्यामुळे कोंबडीचा वेदनादायक मृत्यू झाला. समाज माध्यमांवर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हे कृत्य करणाऱ्या तरुणांवर टीकेची झोड उठली आहे.

चार तरुणांपैकी एका तरुणाने पांढऱ्या रंगाच्या कोंबडीला हातात पकडले आणि इतरांनी या कोंबडीच्या पार्श्वभागात फटाका लावून फोडला. फटाका फुटल्यानंतर हे तरुण खिदळत होते. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) या एनजीओने हा व्हिडीओ समाज माध्यमांवर पोस्ट करत स्थानिक प्रशासन आणि पोलीसांना टॅग केले आहे. तसेच या मुलांवर कारवाईची मागणी केली आहे.