
चार आठवड्यांपूर्वी विणकर कॉलनीत झालेला गोळीबार ताजा असतानाच बुधवारी मध्यरात्री वजिराबाद भागातील दिलीपसिंग कॉलनीमध्ये दोन गटांत वाद होऊन त्यात गोळीबार झाल्याने नांदेड शहर पुन्हा एकदा हादरले. परिसरातील एका नागरिकाने वजिराबाद पोलिसांना ही खबर दिल्यानंतर पोलिसांनी गावठी बंदुकीसह शेख अन्वर अली खान आणि प्रदीप सोनू राऊत्रे या दोघांना अटक केली आहे.
विणकर कॉलनी भागात चार आठवड्यांपूर्वी झालेला गोळीबार ताजा असतानाच काल मध्यरात्री दोन गटांत वादावादी होऊन गोळीबार झाला. दिलीपसिंग कॉलनीमध्ये हा प्रकार घडल्यानंतर त्या भागातील एका नागरिकाने वजिराबाद पोलिसांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केले. यातील शेख अन्वर अली खान आणि प्रदीप सोनू राऊत्रे या दोघांना वजिराबाद पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टादेखील जप्त करण्यात आला आहे. यातील तीन जण अद्याप फरार आहेत. हा वाद नेमका कशामुळे झाला, ही माहिती मिळू शकली नाही.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के, पोलीस निरीक्षक संदीप शिवले व त्यांच्या पथकाने दिलीपसिंग कॉलनी भागात भेट दिली आणि घटनेच्या ठिकाणीच दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टादेखील जप्त करण्यात आला आहे. शहरात आता गावठी कट्टा सहज उपलब्ध होत आहे. हाच या घटनेमागचा पुरावा असून गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर दिलीपसिंग कॉलनी परिसरात घबराट पसरली होती. अवैध धंद्यांच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. गोळीबाराच्या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे नांदेडकर मात्र हादरले आहेत.































































