
फळांचा राजा आणि चवीसाठी प्रसिद्ध असलेला देवगड हापूस आंबा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. आज झालेल्या पहिल्याच सौद्यात पाच डझनांच्या पहिल्या पेटीला तब्बल 51 हजार रुपयांचा रेकॉर्डब्रेक दर निघाला. आतापर्यंत राज्यात हा सर्वाधिक दर मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेरीस हंगामापूर्वीच चक्क परदेशातील दक्षिण आफ्रिकेच्या मालवी हापूस आंब्यासह केरळमधीलही आंब्याचे आगमन झाले होते. कोल्हापुरातील श्री शाहू मार्केटयार्डमध्ये जुबेर बागवान यांच्या दुकानात दाखल झालेल्या परदेशी आंब्याच्या बॉक्सला चार हजार ते चार हजार 500, तर केरळमधील आंब्याला दीड हजारपर्यंत दर मिळाला होता. आता देवगड येथील हापूस आंब्याची प्रतीक्षा लागली असतानाच दरवर्षी मार्चमध्ये दाखल होणारा हापूस आंबा यंदा लवकरच दाखल झाला.
देवगड तालुक्यातील कुंभारमठ येथील शेतकरी सुहास गोवेकर यांनी आणलेल्या हापूस आंब्याचा आज सौदा काढण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी बोली लावत पाच डझनांची पेटी तब्बल 51 हजार रुपयांना खरेदी केली. राज्यात या वर्षी आंब्याला मिळालेला हा उच्चांकी दर कोल्हापुरातून मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. या दरामुळे सुमारे 850 रुपयांना एक आंबा विकला गेला आहे. हा दर आवाक्यात येण्यासाठी सर्वसामान्यांनी वाट पाहावी लागणार आहे.



























































