
सिडकोने म्हाडाच्या धर्तीवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर 4 हजार 508 घरांची योजना आणली आहे. या योजनेतील घरे तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथे उपलब्ध आहेत. योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना उद्या दुपारपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘फर्स्ट कम फर्स्ट चान्स’ या तत्त्वावर घरांची विक्री केली जात आहे.
सिडकोच्या माध्यमातून तळोजा, खारघर, उलवे, द्रोणागिरी या नोडमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती सुरू आहे. हजारो घरे या नोडमध्ये बांधून तयार आहेत. या घरांच्या विक्रीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने सिडकोने आता ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर घरांची विक्री करण्यासाठी 4 हजार 508 घरांची विशेष योजना आणली आहे. त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील 1 हजार 115 तर अल्प उत्पन्न गटातील 3 हजार 393 घरांचा समावेश आहे. दोन्ही उत्पन्न गटातील सर्वाधिक घरे तळोजा नोडमध्ये उपलब्ध आहेत.
आजपासून ऑनलाइन नोंदणी
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर देण्यात येणारी सर्वच घरे ही बांधून तयार आहेत. ही सर्व घरे जुन्या योजनेतील असल्यामुळे त्यांच्या किमती २२ ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान राहणार आहेत.
घर निवडण्याचे स्वातंत्र्य
सिडकोच्या सोयीसुविधांनी सुसज्ज गृहसंकुलातील 4 हजार 508 सदनिका या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेकरिता लॉटरी नसून आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य अर्जदारांना आहे. यामुळे त्यांना आपल्या स्वप्नातील घर मिळणार आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरापैकी एक असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केली आहे.





























































