
परभणी जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या सर्व 9 संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात त्या रुग्णाच्या बहिणीचा देखील समावेश आहे. परभणीत 16 एप्रिल रोजी एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये टाकण्यात आला. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या संशयितांच्या स्वॅबचे नमुणे घेण्यात आले होते. हेच नमुने संभाजीनगरला पाठवल्यानंतर शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचे अहवाल आल्यानंतर परभणीकरांनी सुटकेचा श्वास घेतला.
होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, पुण्याहून परभणीला आलेला युवक ज्या बहिणीकडे थांबला होता, ती इतरांच्या घरात धुणी भांडीचे काम करते. अशात ती ज्यांच्या घरात जाते त्या सर्वांना प्रशासनाने होम क्वारंटाइन केले होते.
प्रशासनाने ती घरकाम करत असलेल्या 5 कुटुंबांची माहिती काढली होती. तसेच या कुटुंबांतील 18 जणांना होम क्वारंटाइन केले होते. आता मात्र, त्या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने ही त्या सर्व कुटुंबियांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे.




























































