
दिल्लीतील पहिले जेन झी पोस्ट ऑफिस आयआयटी दिल्लीच्या कॅम्पसमध्ये उघडण्यात आले आहे. हे अत्याधुनिक पोस्ट ऑफिस जुन्या पोस्ट ऑफिसचे नूतनीकरण करून तयार केले आहे. यामध्ये वाय-फाय आणि क्यूआर कोडद्वारे पार्सल बुकिंगसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. जेन झेडला अनुरूप असे पोस्ट ऑफिसचे डिझाईन करण्यात आले आहे. अर्थात विद्यार्थ्यांनीच ते तयार केलेय. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. मॉडर्न इंटिरियर, वाय-फाय झोन, ग्राफिटी आणि आयआयटी दिल्लीच्या फाईन आर्ट सोसायटीने तयार केलेले आर्टवर्क आदीचा समावेश आहे.
जेन झी पोस्ट ऑफिसात स्टुंडंट फ्रेंइली स्पीड पोस्ट डिस्काऊंट आणि स्मार्ट सर्विस टचपॉइंट्ससारख्या सुविधा आहेत. जेन झेड पोस्ट ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांचा थेट सहभाग असेल. आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर, डिझायनर कोप्रोड्युसर आणि सोशल मीडिया साथीदार म्हणून काम पाहतील.
आयआयटी दिल्लीप्रमाणे देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये जेन झेड पोस्ट ऑफिस सुरू करण्याचा विचार आहे. 15 डिसेंबर 2025 पर्यंत देशभरातील 46 शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये असलेल्या पोस्ट ऑफिसला जेन झी मॉडेलमध्ये बदलले जाणार आहे. आयआयटी कॅम्पसमधील पोस्ट ऑफिसचा लाभ 10 हजारांहून अधिक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना घेता येईल.


























































