अशी बनली पहिली जीन्सची पँट.. वाचा रंजक इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या अनेक दशकांपासून जीन्स आपल्या दररोजच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक बनली आहे. विशेषतः डेनिम जीन्स नावाचा प्रकार तर फार काळापासून लोकप्रिय आहे. जीन्समध्ये खूप नवीन प्रकार आले तरी डेनिम नावाचा क्लासिक प्रकार आजही लोकप्रिय आहे.

कोणी लोकांनी जीन्सच्या नावाने गोणपाट म्हणून नाकं मुरडली तरी तिची लोकप्रियता लिंग, वय आणि वर्ग यांना पुरून उरली आहे. जीन्स हा लोकप्रिय कापड प्रकार नेमका अस्तित्वात आला तरी कसा? कोरा या मराठी प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावर याचं उत्तर देण्यात आलं आहे.

जीन्सचा जन्मही एका गरजेपोटी झाला. सॅन फ्रान्सिस्को म्हणजे सोन्याच्या खाणींचं माहेरघर! अनेक खाण कामगार इथं सोनं शोधण्यासाठी जीवाचं रान करत असत. मिळालेले सोने ते पॅन्टच्या खिशात ठेवत असत. पण असे केल्याने खिसे वारंवार फाटत असत. म्हणूनच त्यांना मजबूत, आरामदायक आणि बराच काळ टिकणारी पॅन्ट हवी होती. या मजबूत कापडाचे श्रेय जातं ते लेव्ही स्ट्रॉसला! खरं तर सुक्या मेव्याचा व्यवसाय करण्यासाठी तो आपल्या कुटुंबासह जर्मनीहून न्यूयॉर्कला स्थायिक झाला होता. तो इतर देशांतून एक विशिष्ट प्रकारचे जाडजूड कापडही मागवत असे.

त्याचा एक ग्राहक जॅक डब्ल्यू डेव्हिस नावाचा टेलर होता. मूळत: रेनो, नेवाडा येथील डेव्हिसने आपल्या व्यवसायासाठी लेव्हीचे डेनिम फॅब्रिक खरेदी केले होते, तेथे त्याने तंबू आणि वॅगन कव्हर सारख्या वस्तू तयार केल्या. एके दिवशी अलकाली इके नावाचा एक खाण कामगारांचे कपडे शिवणारा टेलर जेकब डेव्हिसकडे आला आणि त्याने त्याला आपली समस्या सांगितली. जेकब डेव्हिसने तंबू, ब्लँकेट आणि कव्हर बनवण्यासाठी वापरले जाणारे लेव्ही स्ट्रॉसचे जाड कापड वापरलं आणि त्या कपड्यातून पॅन्ट बनवली, खाणकामगारांना जशी मजबूत लागते तशीच.

जेकब डेव्हिसने हा प्रश्न सोडवण्याचा एक मार्ग शोधला आणि पॉकेट्सच्या कोपऱ्यात आणि अधिक जोर असलेल्या ठिकाणी पॅन्ट अधिक मजबूत करण्यासाठी तांब्याच्या रिव्हेट्स जोडल्या. या पँटने अलकाली इकेचा प्रश्न तर सुटला. परंतु टेलर जेकब डेव्हिस याला वाटलं की ही समस्या सर्व खाण कामगारांची आहे, मग त्याचे पेटंट मिळवून व्यापार का करू नये. हे पेटंट एकट्याने मिळवू शकेल इतके पैसे त्याच्याकडे नव्हते. त्याला लेव्ही स्ट्रॉसकडून कापड मिळायचे. त्याला या व्यवसायाची कल्पना दिली आणि 50% भागीदारीमध्ये काम करायचा प्रस्ताव मांडला, जो लेवी स्ट्रॉसने स्वीकारला.

त्यांनी मिळून पेटंटसाठी अर्ज केला पण पेटंट मिळविण्यात बराच विलंब झाला. शेवटी कंटाळून जेकब डेव्हिसने आपला 50% हिस्सा लेव्ही स्ट्रॉसला विकला. आता या पेटंटवर लेव्ही स्ट्रॉसची संपूर्ण मालकी असणार होती. पेटंट मिळाल्यावर लेव्ही स्ट्रॉसने मोठ्या प्रमाणात जीन्सच्या उत्पादनाला सुरुवात केली आणि हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांना घेऊन जाहिरातीही केल्या.

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते चित्रपटात देखील लेव्हाईस जीन्सचा वापर करू लागले आणि या जीन्स घराघरात पोचल्या. मात्र श्रमिक, कामगार, शेतकरी हे त्यांचे प्राथमिक ग्राहक होते. एका जीन्सची किंमत 22 सेंट ठेवताना त्याने तिच्या मजबुतीची हमी दिली. जाहिरातींमध्ये त्याने जीन्स शेतकरी, यांत्रिकी आणि खाण कामगारांसाठी उपयुक्त असल्याचे वर्णन केले. ही जीन्स फाटल्यास दुसरी जीन्स विनामूल्य देण्याचे देखील त्याने जाहीर केले.

त्याने बनवलेला ट्रेडमार्क हा लिव्हाईज जीन्सच्या मजबुतीची कल्पना देणारा होता – मधोमध ठेवलेल्या जीन्सच्या दोन बाजुंनी ओढणारे घोडे. 1890 मध्ये, लेव्हियस स्ट्रॉस यांनी ‘लुईस स्ट्रॉस आणि कंपनी’ ची स्थापना केली आणि ते जीन्स क्रांतीचे जनक बनले. 1954 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मन्रोने प्रथमच चित्रपटात जीन्स परिधान करून महिलावर्गात देखील तिची लोकप्रियता वाढविण्यास मदत केली.

1960 च्या दशकात फ्लाय-फ्रंट जिपर ओपनिंगसह महिलांची जीन्स उपलब्ध झाली. यामुळे, स्त्रियांसाठी जीन्स पॅन्टच्या विक्रीला चालना मिळाली. सुरुवातीला जेव्हा जीन्स मुलींसाठी बनविली जात असे तेव्हा झिप एका बाजूला दिली जात असे. परंतु मुलींच्या कंबरेचा आकार असा आहे की त्यामुळे जीन्स घालणे कठीण होते आणि फिटिंग देखील योग्य नसते. आता मुलींची जीन्सही पुरुषांप्रमाणे होऊ लागली. हे परिधान करणे देखील सोपे होते आणि आकारही चांगला दिसत होता.

ज्या फॅब्रिकमधून जीन्स बनविल्या जातात त्यास प्रथम “सर्ज डी नाइम्स” असे नाव दिले गेले, ज्याचं पुढे डेनिम्स बनले. हळूहळू डेनिम्स संपूर्ण युरोपमध्ये लोकप्रिय झाले. हे बहुतेक नाविकांनी पसंत केले आणि त्यास ‘जीन्स’ नाव दिले. प्रथम जीन्स निळ्या रंगाची बनविली गेली होती कारण ती फार मळत नाही. थोड्या जाड परंतु नरम फॅब्रिकचे बनलेले जीन्स खलाशी व मजुरांसाठी उपयुक्त होते, ते त्यास तळापासून फोल्ड करून देखील घालू शकत होते.

सुरुवातीला त्याची लोकप्रियता कमी करण्यासाठी अमेरिकेत रेस्टॉरंट्स, थिएटर आणि शाळांमध्ये जीन्स घालण्यास बंदी घातली गेली. जीन्स नेहमीच एक फॅशन स्टेटमेंट असते. त्यात विविध प्रकारचे प्रयोग केले गेले आहेत. ती कधी झिजलेली जीन्स असते तर कधी फाटल्यासारखी वाटणारी असते, तर कधी लो वेस्ट फॅशन घेऊन अवतरते! काही असो, जीन्सचा उगम झाल्यापासून ते आतापर्यंत, वेगवेगळ्या वयोगटातील आबालवृद्धांना ती नेहमीच आकर्षित करत आली आहे, हे नक्की!