मेघा धाडे महाराष्ट्राची पहिली बिग बॉस

46

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘इथं दिसतं तसंच असतं’ असं म्हणत सुरू झालेला ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिजनचा पहिला विजेता कोण होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अभिनेत्री मेघा धाडे हिने विजेतेपदावर आपले नाव कोरले. १८ लाखांचा धनादेश आणि आलिशान घर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘बिग बॉस’च्या अंतिम फेरीसाठी मेघा धाडे, पुष्कर जोग, आस्ताद काळे, सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर या सहा स्पर्धकांमध्ये चुरस होती. अंतिम फेरीला सुरुवात झाल्यानंतर शर्मिष्ठा, आस्ताद, सईपाठोपाठ स्मिता स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर पुष्कर आणि मेघा यांच्यात विजेतेपदासाठी शर्यत सुरू झाली. अखेर सगळ्यांवर मात करत मेघाच बिग बॉसच्या पहिल्याच सिजनची पहिली विजेती ठरली. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी मेघाच्या नावाची घोषणा केली.

सुरुवातीपासूनच विजेतेपदासाठी मेघा धाडे प्रमुख दावेदार समजली जात होती. बिग बॉसने दिलेले टास्क पूर्ण करण्यासाठी उत्तम रणनीती आखणे, त्याच जिद्दीने टास्क पूर्ण करणे, प्रेमाने सगळ्यांचे मन जिंकणे यामुळे सुरुवातीपासूनच मेघा प्रेक्षकांची फेव्हरेट होती. सोशल मीडियातही मेघाच विजेती होणार अशा चर्चाही रंगत होत्या.

‘बिग बॉस’ जिंकण्याचा माझं स्वप्न आज पूर्ण झालं. माझ्यावर प्रेम करणाऱया चाहत्यांचे मनापासून आभार. हा खेळ मी मनापासून खेळले. ‘इमोशन’शिवाय हा खेळ पूर्ण होऊ शकत नाही.
– मेघा धाडे, बिग बॉस विजेती

आपली प्रतिक्रिया द्या