
ऐतिहासिक ठाणे शहराच्या सर्वांगीण जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान देणारे माजी महापौर, माजी खासदार व शिवसेना नेते सतीश प्रधान आज पंचत्वात विलीन झाले. जवाहरबाग येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारो ठाणेकरांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. राजकारण, साहित्य, कला, क्रीडा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर या वेळी उपस्थित होते. ठाण्याच्या विकासासाठी झटणारे प्रधान सर कायम स्मरणात राहतील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
ठाण्यात शिवसेनेची पाळेमुळे भक्कमपणे रोवणारे सतीश प्रधान यांचे रविवारी वयाच्या 84व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी प्रधान यांनीच स्थापन केलेल्या ज्ञानसाधना महाविद्यालयात आणण्यात आले. या वेळी असंख्य ठाणेकरांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. महाविद्यालयातील अनेक शिक्षक तसेच विद्यार्थी यांनीदेखील प्रधान यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सतीश प्रधान यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्ञानसाधना महाविद्यालयापासून सतीश प्रधान यांची अंत्ययात्रा सुरू झाली. फुलांनी सजवलेल्या गाडीमध्ये सतीश प्रधान यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत मुलगा कमलेश, मुलगी अश्विनी यांच्यासह निकटचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता. जवाहरबाग येथील स्मशानभूमीत पार्थिव आणल्यानंतर पोलिसांनी मानवंदना दिली. त्यानंतर शासकीय इतमामात प्रधान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
5 जानेवारी रोजी शोकसभा
सतीश प्रधान यांना आदरांजली वाहण्यासाठी 5 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ज्ञानसाधना महाविद्यालयात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी घेतले अंत्यदर्शन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालय येथे सतीश प्रधान यांचे अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी प्रधान यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी शिवसेना नेते राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, प्रकाश पायरे, प्रशांत सातपुते यावेळी उपस्थित होते.