एलओसीवर हिंदुस्थानी जवानांचे तांडव; पाकिस्तानी चौक्या केल्या उद्ध्वस्त, अधिकृत व्हिडीओ आला समोर

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी हिंदुस्थानवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करत जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, उधमपूर, होशियारपूर येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानी लष्कराने हे हल्ले परतवून लावले. रशियाकडून घेतलेल्या एस-400 हा एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचा प्रत्येक हवाई हल्ला निष्प्रभ केला. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना हिंदुस्थाननेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून नियंत्रण रेषेवर तांडव सुरू केले. अशातच हिंदुस्थानी लष्कराकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. याच नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानची एक चौकी हिंदुस्थानी जवान क्षेपणास्त्राने उडवताना दिसत आहे.

गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले हिंदुस्थानने परतवून लावले आहेत. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आले. आता लष्कराकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून 8-9 मेच्या मध्यरात्री काय घडले याबाबत माहिती दिली आहे.

हे वाचा – ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, हम सब साथ है… सरकारच्या भूमिकेला सर्वच पक्षांचा एकमुखी पाठिंबा

हे वाचा – पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर

लष्कराने आपल्या निवेदनामध्ये म्हटले की, ‘8 आणि 9 मे, 2025 च्या मध्यरात्री पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानी सैन्याने अनेक हल्ले केले. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरही पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. हिंदुस्थानने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले आणि नियंत्रण रेषेवरील गोळीबाराचाही चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानी लष्कर देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करम्यास कटिबद्ध असून सर्व नापाक योजनांना पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल.’