पहिला ऑक्सिजन प्लाण्ट ठाणे महापालिकेने उभारला, रोज 3.2 टन प्राणवायू मिळणार

दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता ठाणे महापालिकेने ‘पार्पिंग प्लाझा कोविड सेंटर’च्या आवारात दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारले आहेत. महाराष्ट्रदिनी आजपासून हे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. या प्रकल्पातून रोज 3.2 टन प्राणवायूची निर्मिती होणार आहे.

एवढय़ा मोठय़ा क्षमतेचा मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर रिजन) हा पहिलाच ऑक्सिजन जनरेशन प्लाण्ट आहे. फक्त दहा दिवसांत हा प्रकल्प उभारला असल्यामुळे रुग्णांना हक्काचा ऑक्सिजन मिळण्यास सुरुवात झाली आहे.पार्पिंग प्लाझा कोविड सेंटर आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले असून रोज तीनशे बेड्सना प्राणवायूचा पुरवठा करता येईल. कळवा हॉस्पिटल तसेच व्होल्टास पंपनी येथेही अशाच प्रकारचे भव्य ऑक्सिजन जनरेशन प्लाण्ट उभारले जाणार असून ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ज्युपिटर हॉस्पिटलजवळ ‘पार्किंग प्लाझा’ येथे ठाणे महापालिकेने एक हजार बेडचे भव्य कोविड सेंटर उभारले आहे. वाढणारी रुग्ण संख्या तसेच ऑक्सिजनचा कमी होणारा पुरवठा यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याच सेंटरमध्ये काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने काही रुग्णांना तातडीने अन्य रुग्णालयांत हलवावे लागले होते. शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची तातडीने दखल घेतली. तसेच याच सेंटरच्या मागील बाजूस ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले. त्यानंतर विक्रमी काळात हा प्रकल्प सुरू झाला असून त्याचे लोकार्पण आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

एअरॉक्स कंपनीने उभ्या केलेल्या या दोन्ही ऑक्सिजन जनरेशन प्लाण्टद्वारे प्रतिदिन 350 सिलिंडर म्हणजेच 3.2 टन एवढा ऑक्सिजन निर्माण होणार आहे. रोज 850 लिटर ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे.
ठाणे जिह्याची ऑक्सिजनची गरज प्रतिदिन 300 मेट्रिक टन एवढी असून प्रत्यक्ष पुरवठा हा 200 मेट्रिक टन एवढाच होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन प्लाण्ट उभे करणे गरजेचे बनले होते.

एकूण चार प्लाण्ट होणार

ठाणे महानगरपालिका कळवा हॉस्पिटल, व्होल्टास पंपनी येथेही दोन प्लाण्ट उभारणार असून शहरात 4 ऑक्सिजन प्लाण्ट उभे करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पांमुळे ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, सभागृह नेते अशोक वैती आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या