सामना प्रतिनिधी । पैठण
‘वनाधिकाऱ्यांनी हिंस्र प्राण्याचा शोध घेताना गांभीर्य बाळगावे. कारण शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. फोटोसेशन कसले करता? आधी ‘त्या’ नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा आणि मगच चमकोगिरी करा,’ असा इशारा आमदार संदिपान भुमरे यांनी दिला. ७ महिन्यांपासून पैठण परिसरातील गोपेवाडी व अन्य ८ गावांच्या शेतशिवारांवर बिबट्याच्या दहशतीचे सावट पसरले आहे. वन विभागाने आतापर्यंत निवळ बनवाबनवी करत दिरंगाई केली. अखेर भारत ठेणगे या शेतकऱ्याचा बळी घेऊन हा बिबट्या नरभक्षक बनला. त्यानंतरसुद्धा वनविभागाने कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे कातपूर, नवगाव, रहाटगाव, गोपेवाडी, शृंगारवाडी, माळवाडी, आखतवाडा, आपेगाव व ऊसक्षेत्र असलेल्या परिसरातील शेतवस्त्यांमध्ये मोठी दहशत दिसून येत आहे.
पोळा सणालाही शेतकऱ्यांनी शेती शिवारात जाऊन पूजा अर्चा केली नाही. या भीतिदायक पार्श्वभूमीवर वनाधिकारी यांनी एका जंगलात शस्त्रे हातात घेऊन स्वत:चे फोटो काढून माध्यमांना पाठवले. सोशल मीडियाद्वारे हे फोटोसेशन व्हायरल झाले. आधीच वनाधिकाऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या तक्रारी असताना हा चमकोगिरीचा प्रकार समोर आल्याने बिबट्या प्रवण क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात आला.
दै. ‘सामना’त याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यावर अनेकांनी या वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान, या चमकोगिरीचे आमदार संदिपान भुमरे यांनी वाभाडे काढत वनाधिकाऱ्यांना समज दिली. कोणत्याही परिस्थितीत नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा. मगच फोटोसेशन करा, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत वनरक्षक गोविंद वैद्य यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘हा बिबट्या आता पैठण तालुक्यातील हद्द ओलांडून अंब तालुक्यात गेलेला आहे. आमचे पथक व जालना जिल्हा पथक या परिसरात संयुक्त कारवाई करत आहोत. लवकरच बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करू.’तर आमदार संदिपान भुमरे यांचे स्वीय सहाय्यक तथा गोपेवाडीचे रहिवासी नामदेव खराद यांनी दावा केला की, ‘अनेक ग्रामस्थांनी गोपेवाडी शिवारात बिबट्याला पाहिले आहे. उसाच्या शेताजवळ असलेला हा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून हे फोटो आम्ही वनाधिकारी यांना पाठवले आहेत.
बिबट्याच्या भीतीने शेती, कारखान्यात जाणे बंद
जायकवाडी : परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामावर न गेल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. रहाटगाव, आपेगाव, कातपूर वडवाळी या परिसरातील अनेक तरुण पैठण एमआयडीसी परिसरातील कारखान्यात काम करतात. या कामगारांनी मागील काही दिवसापांसून बिबट्याच्या दहशतीमुळे कारखान्यात कामावर जाणेबंद केले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग अपयशी ठरत असल्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संतापाची भावना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे एकट्याने घराबाहेर पडणे अशक्य झाल्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. शेतमजूर व कामगार यांच्यावर बिबट्याच्या दहशतीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.



























































