
देशाची पहिली खासगी ट्रेन ‘तेजस एक्प्रेस’ दोन वर्षांतून पहिल्यांदा लेट झाली आहे. 21 ऑगस्ट रोजी लखनौ जंक्शनवरून वेळेवर निघालेली ‘तेजस एक्प्रेस’ दिल्लीला पोहचेपर्यंत अडीच तास लेट झाली. दिल्लीत झालेल्या जोरदार पावसाने सिग्नल यंत्रणा फेल झाली आणि यार्डात पाणी साचल्याने या ट्रेनला उशीर झाला. त्यामुळे नियमाप्रमाणे आयआरसीटीसीने क्लेम करणाऱया 1,574 पॅसेंजरना मंगळवारी 3 लाख 93 हजार 500 रुपयांची भरपाई दिली आहे.
प्रवाशांना विमानसेवेप्रमाणे लक्झरीय सेवा पुरविणाऱया ‘तेजस एक्प्रेस’मध्ये ट्रेन काही कारणांनी लेट झाली तर प्रवाशांना रिफंड दिला जातो. जर ट्रेन दोन तासांहून अधिक वेळ लेट झाली तर प्रत्येक प्रवाशाला अडीचशे रुपयांचा रिफंड दिला जातो. एक तास लेट झाली तर शंभर रुपयांचा रिफंड आयआरसीटीसीकडून मिळतो. देशात पहिल्यांदाच खासगी तेजस एक्प्रेस ऑगस्ट 2019मध्ये सुरू करण्यात आली. कोरोनाच्या दुसऱया लाटेत 4 एप्रिलला ही ट्रेन बंद केली होती. आता 7 ऑगस्टपासून लखनौ ते नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणाऱया या दोन तेजस एक्प्रेसना पुन्हा सुरू केले आहे. ‘तेजस एक्प्रेस’चे भाडे विमानाप्रमाणे फ्लेक्सी फेअर असून आसनांच्या बुपिंगच्या मागणीप्रमाणे ते वाढत असते. लखनौ ते दिल्लीपर्यंत चेअरकारचे बेस फेअर 1,125 रु., तर एक्झिक्युटीव्ह क्लासचे बेस फेअर 1,280 रु. आणि एक्झिक्युटीव्ह चेअरकारचे भाडे 2,450 रुपये इतके आहे.




























































