कोरोनाची वर्षपूर्ती आणि कायम आव्हाने

>> अनंत बोरसे

कोरोनाने केवळ आर्थिक, जीवितहानीच नाही तर चहुबाजूंनी नुकसानच झाले आहे. या पुढील काळात संपूर्ण लॉक डाऊन कोणालाही परवडणार नाही. पण कोरोनाची दुसरी लाटही भयंकरच आहे. त्यामुळे सरकारने कडक निर्बंध आणि वीकेंड लॉक डाऊन असा पर्याय 30 एप्रिलपर्यंत निवडला आहे. तो योग्य आहे. मागे वळून पाहिले असता आपला वर्षभराचा प्रवास ‘लॉक डाऊन ते लॉक डाऊन व्हाया अनलॉक’ असा होऊन आपण पुन्हा एकदा BACK TO SQUARE अर्थात जिथून सुरुवात केली तिथेच येऊन पोहोचलो आहोत, हे अतिशय खेदजनक आहे.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या कोणालाही कल्पना नव्हती की येणारे साल सर्वांसाठी एक मोठे जागतिक संकट घेऊन आले आहे. जगभर कोरोनाच्या जागतिक महामारीचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आणि आपल्या देशात मार्च महिन्यात गांभीर्याने पावले उचलली गेली. देशातील पहिले लॉक डाऊनसारखे पाऊल उचलले गेले. देशपातळीवर एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळला गेल्यानंतर 24 मार्चपासून एकवीस दिवसांचा पहिला देशव्यापी लॉक डाऊन घोषित झाला. त्या वेळी कोरोनाविरुद्धचे युद्ध एकवीस दिवसांत संपेल असा विश्वास जनतेला दिला गेला, मात्र हळूहळू कोरोना संकटाविरुद्ध दीर्घकाळ लढावे लागेल आणि काही काळ कोरोनासोबतच जगावे लागेल हे स्पष्ट झाले. या काळात चार टप्पे लॉक डाऊनचे झाले, मग हळूहळू पुनश्च हरिओम म्हणत अनलॉकचे प्रयत्न सुरू झाले. काही प्रमाणात कोरोना नियंत्रणात आला, मात्र आज एक वर्षानंतरही आपल्याला कोरोना संकटाच्या सावटाखाली जगावे लागत आहे ही नक्कीच सर्वांची चिंता वाढविणारी बाब आहे. मुंबई-ठाणे परिसरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ लागला आहे. आता पुढे किती काळ कोरोनाशी सामना करण्यात घालवावा लागणार याबाबत सगळीच अनिश्चितता आहे.

अगोदरच आर्थिक मंदीचे सावट देशावर असताना गेल्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना संकटाच्या जागतिक महामारीने आपल्या सर्वांसमोर मोठेच आव्हान निर्माण केले. केवळ जीव वाचविण्याबरोबरच जगण्यासाठी आर्थिक चक्राला गती मिळणे तितकीच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. कोरोनाशी कसे लढायचे याबाबत निश्चित रणनीती नव्हती की औषध नव्हते. कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन गेल्या वर्षी 22 मार्च रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यू जनतेने उत्स्फूर्तपणे पाळला आणि 23 मार्च रोजी पंतप्रधानांनी 21 दिवसांचा देशव्यापी लॉक डाऊन घोषित केला. जवळपास सर्वच जगरहाटी ठप्प झाली. कोरोनाशी कसे लढावे याबद्दल सर्वच अनभिज्ञ होते. म्हणूनच मग स्वच्छ हात धुणे, एकमेकांच्या संपर्कात न येणे, गर्दी टाळणे यावर भर दिला गेला. मात्र 133 कोटी जनता असलेल्या देशात इतक्या काटेकोरपणे लॉक डाऊन पाळणे शक्य नव्हतेच. अगोदरच आर्थिक मंदीचे सावट देशावर असताना लॉक डाऊनने देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत करून टाकली होती. म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू करणे तितकेच महत्त्वाचे होते. शासन-प्रशासनाबरोबरच सर्वच यंत्रणा कामाला लागल्या. पंतप्रधानांनी कोरोनाविरुद्धचे युद्ध 21 दिवसांत जिंकू असा विश्वास दिला. मात्र जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे कोरोना संकट अधिकच गडद होऊ लागले. सरकारने तातडीने 1.75 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले. कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस सर्वांचीच चिंता वाढविणारी ठरू लागली. जनतेचे जीव वाचविण्याबरोबरच जगण्यासाठीची धडपड अपरिहार्य ठरू लागली आणि चार लॉक डाऊननंतर 3 जूनपासून पुनश्च हरिओम करण्यासाठी अनलॉकला हळूहळू सुरुवात झाली. त्याअगोदर मे महिन्यात देशासाठी वेगळा पीएम केअर फंडाची निर्मिती केवळ कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केली गेली. वीस लाख कोटींचे महापॅकेज जाहीर केले गेले. वाटले होते कोरोनाचा संघटितपणे सामना करून लवकरच हे संकट दूर होईल, मात्र दुर्दैवाने तसे काही न होता कोरोना बाधितांची आणि मृतांची आकडेवारी दिवसेंदिवस चढतीच राहिली. याच काळात शासन-प्रशासनाच्या समन्वयाचा अभाव, केंद्र-राज्य सरकारांमधील तु-तु-मै-मै, श्रेयवादाची लढाई, लाखो मजबूर मजुरांच्या घरवापसीचा अभूतपूर्व प्रसंग जनतेने अनुभवला. एकीकडे सामान्य जनतेतील माणुसकीचे दर्शन घडत होते तर दुसरीकडे समाजातील काही अपप्रवृत्तींकडून संकटातही संधी शोधत बेसुमार लुटमार होताना मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱयांची गिधाडी प्रवृत्ती दिसली. एकिकडे देशातील 90-95 टक्के जनता आर्थिक कोंडीत सापडली असताना काहींना संपत्ती दुप्पट, तिप्पटीने वाढविण्याचे कौशल्य लाभले. कोरोनावर लस येईल या आशेवरच रात्रीच्या अंधारात तीर मारणे एवढेच आपल्या हाती होते. याच काळात अनेक कोरोना योद्धा आपल्या जिवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत होते.
अशातच नोव्हेंबर-डिसेंबरपासून लसीच्या आशेचा किरण दिसू लागला. काही प्रमाणात कोरोना संकट दूर होऊ लागले. जनतेला अधिकाधिक दिलासा मिळू लागला. अर्थचक्राला गती मिळू लागली. आता सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून ‘तो’ परत आला आणि पुन्हा एकदा कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. महाराष्ट्र तर पहिल्यापासूनच कोरोना बाधितांच्या आणि मृतांच्या आकडेवारीत वरच्या क्रमांकावर राहिला आहे. आजच्या घडीला तर संपूर्ण आशिया खंडात महाराष्ट्राची संख्या सर्वाधिक असून, संपूर्ण राज्य हॉटस्पॉट बनेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. टेस्टिंग आणि लसीकरण मोठय़ा प्रमाणावर होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राज्याला सढळहस्ते मदत करायला हवी, मात्र राज्याबरोबर दुजाभाव होत असल्याचे डॉ. सशांक जोशी यांचे म्हणणे आहे. आजवर लाखो बाधित झाले तर हजारो दुर्दैवी बळी गेले आहेत. या परिस्थितीला समाजातील काही थोडक्यांचा बेजबाबदारपणाचे हे फलित असले तरी त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागते आहे. आता परत एकदा सरकारकडून लॉक डाऊन होऊ नये असे प्रयत्न केले जात असले तरी अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू, मर्यादित कालावधीसाठी लॉक डाऊन, कडक निर्बंध, अशी पावले उचलली जात आहेत. जर अशीच परिस्थिती राहिली तर परत एकदा आपल्या सर्वांनाच लॉक डाऊनशिवाय पर्याय उरणार नाही.

कोरोनाने केवळ आर्थिक, जीवितहानीच नाही तर चहूबाजूंनी नुकसानच झाले आहे. या पुढील काळात संपूर्ण लॉक डाऊन कोणालाही परवडणार नाही. पण कोरोनाची दुसरी लाटही भयंकरच आहे. त्यामुळे सरकारने कडक निर्बंध आणि वीकेंड लॉक डाऊन असा पर्याय 30 एप्रिलपर्यंत निवडला आहे. तो योग्य आहे. मागे वळून पाहिले असता आपला वर्षभराचा प्रवास ‘लॉक डाऊन ते लॉक डाऊन व्हाया अनलॉक’ असा होऊन आपण पुन्हा एकदा BACK TO SQUARE अर्थात जिथून सुरुवात केली तिथेच येऊन पोहोचलो आहोत हे अतिशय खेदजनक आहे. या संकटाचा सामना करताना चहूबाजूंनी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि मुंबईचे उपनगर असलेला ठाणे जिल्हा या परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट गडद होऊ लागले आहे हे निश्चितच आपणा सर्वांची चिंता वाढविणारी बाब आहे, मात्र धिराने आणि संयमाने यातून सर्वांना मार्ग काढावाच लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या