
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मत्स्य दुष्काळग्रस्त रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांच्या वेदना मांडण्यासाठी होऊ घातलेली बहुचर्चित मत्स्य दुष्काळ परिषद मालवण दांडी समुद्रकिनारी मंगळावर 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मत्स्य दुष्काळग्रस्त पारंपरिक मच्छीमारांनी मोठ्या संख्येने परिषदेस उपस्थित रहावे, असे आवाहन मालवणातील पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने करण्यात आले आहे.
मत्स्य दुष्काळ परिषदेची तारीख निश्चित करण्यासंदर्भात आयोजित बैठकीस आबा वाघ, भाऊ मोरजे, संतोष शेलटकर, नितीन परूळेकर, महेंद्र पराडकर आदी मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते. परिषद तीन तास चालणार आहे. प्रत्येक वक्त्याला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ ठरवून दिला जाणार आहे. पारंपरिक मासेमारी प्रकारातील रापण, वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले, आऊटबोट इंजिनच्या साह्याने गिलनेट प्रकारातील मांड मासेमारी करणारे, न्हैय मासेमारी करणारे बल्यावधारक, मासे विक्रेत्या महिला, स्वतः मासेमारीस जाणाऱ्या महिला तसेच पारंपरिक मच्छीमारांच्या मासळीची वाहतूक करणारे हातगाडी व रिक्षा टेम्पो व्यावसायिक, बर्फ कारखानदार, मच्छीमार सहकारी संस्था, मासेमारी साहित्य विक्रेते, इंजिन दुरुस्ती करणारे, मासळी एजंट, लीलाववाले याबरोबरच हॉटेल व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक, मालवणातील व्यापारी, मत्स्य खवय्ये यापैकी प्रत्येकी एक प्रतिनिधी मत्स्य दुष्काळाबाबतचा आपला लिखित स्वरुपातील अहवाल परिषदेत सादर करतील. त्यानंतर परिषदेचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते आपले विचार मांडतील. पारंपरिक मच्छीमार व त्यावर अवलंबून असलेल्या घटकांबरोबरच पारंपरिक मच्छीमारांशी संबंधित डॉक्टर्स, वकील, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यांना आमंत्रित केले जाणार आहे.
‘मी मत्स्य दुष्काळग्रस्त’ मोहिम
मत्स्य दुष्काळ परिषदेत येणाऱ्या मच्छीमारांनी आपणास गेल्या काही वर्षात मत्स्य दुष्काळ कसा भेडसावतोय हे लिखित स्वरुपात मांडावे यासाठी ‘मी मत्स्य दुष्काळग्रस्त’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत वल्हवून तियानी मासेमारी करणारे, मांड व्यावसायिक, रापण व्यावसायिक, हातगाडीधारक, मासे वाटावणारे, मासेमारीचे साहित्य विक्री करणारे आणि स्वतः मासेमारीस जाणाऱ्या महिलेने मत्स्य दुष्काळाबाबतचा आपला अहवाल मत्स्य दुष्काळ परिषदेच्या आयोजकांकडे सादर केला आहे. लवकरच ईतर संबंधित घटकांकडून मत्स्य दुष्काळाचे अहवाल सादर होतील. असे मच्छीमारांनी सांगितले. पारंपरिक मच्छीमारांनी आपले लेखी स्वरुपातील म्हणणे महेंद्र पराडकर (9421236201) यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेत सादर होणाऱ्या सर्व दस्तऐवजाचे एकत्रीकरण करून पुस्तक रुपाने ती प्रकाशित करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
दोन लाख पारंपरिक मच्छीमारांना दुष्काळाच्या झळा
शासनाने मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, अशी जिल्ह्यातील व राज्यातील पारंपरिक मच्छीमारांची मागणी आहे. ही मागणी मत्स्य दुष्काळ परिषदेत लावून धरली जाईल. शासनाची आकडेवारी काही सांगो पण राज्यातील सुमारे दोन लाख पारंपरिक मच्छीमारांना गेली काही वर्षे समाधानकारक मासे मिळत नाहीत. त्यांचे आर्थिक उत्पन्न प्रचंड घटलेय ही वस्तुस्थिती आहे. शासनाकडे सातत्याने मत्स्य दुष्काळाबाबत पाठपुरावा करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाणार आहे. या मागणीला पुस्तकरुपी अहवालाचे पाठबळ मिळेल, असे पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले.
संपूर्ण जिल्हात संपर्क अभियान
मत्स्य दुष्काळ परिषदेस मोठ्या संख्येने मच्छीमारांनी उपस्थिती दर्शवावी म्हणून मालवणातील पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने जिल्हाभर संपर्क अभियान राबविले जात असून देवगड, मालवण व वेंगुर्लेतील पारंपरिक मच्छीमारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत.























































