मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; महाराष्ट्र कृती समितीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे मच्छीमार बांधवांच्या हालात आणखीनच भर पडली आहे. केंद्र सरकारने 24 मार्च 2020 रोजी अत्यावश्यक सेवा म्हणून मत्स्य खरेदी-विक्री तसेच वाहतूक करण्याची परवानगी दिली असली तरी पकडलेले मास नाशवंत असल्याने जमावबंदी व संचारबंदीमुळे मासे विक्रीवर गंडांतर आले असून त्यात राज्य सरकारने लक्ष घालून मासेमारी क्षेत्रात काम करणाऱया प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे.

गेल्या सन 2019-20 च्या मोसमात अतिवृष्टी आणि चक्रीवादळांमुळे मुख्य मोसम वाया गेला. त्यामुळे मच्छीमारांचे किमान एक हजार कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने केवळ 65 कोटी 17 लाख रूपये भरपाई दिली. यामध्ये मासे विक्री करणार्यांना सर्वसामान्य मच्छीमार महिलांना काहीही मिळालेले नसल्याचे कृती समितीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मच्छीमारांना बँक व एन.सी.डी.सी.चे कर्ज भरणे अवघड झाले आहे. सोनेनाणे गहाण ठेवले आहे. त्यामुळे नौकेवरील तांडेल, खलाशी यांचा मेहनताना देणार कुठून? त्यामुळे मासेमारी क्षेत्रात काम करणाऱया प्रत्येक कुटुंबाला मदत म्हणून प्रत्येकी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी केली आहे.

गर्दी उगाच केली नाही… 

गुरुवार दिनांक 29 एप्रिल 2021 रोजी दै. ‘सामना’मध्ये ससून डॉक येथे मासे खरेदीवर झुंबड करणाऱयांना कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, अशा मथळ्याखाली फोटो छापून आला होता. त्यावर कृती समितीने खुलासा करताना आता केवळ 30 दिवस मासेमारी व्यवसाय करता येणार असून त्यानंतर 1 जूनपासून 61 दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी आहे. त्यामुळे भरपूर मासेमारी करून मासे मिळण्याचे शेवटचे काही दिवस उरले असल्याने ही गर्दी उसळल्याचे म्हटले आहे.