दोन महिन्याच्या विश्रांतीसाठी हजारो नौका किनाऱ्यावर; उरणचे किनारे गजबजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

जून महिन्यापासून खोल समुद्रातील मासेमारीला बंदी असल्यामुळे उरणचे किनारे मच्छिमारी नौकांनी गजबजून गेले आहेत. मच्छिमारांनी आपल्या मच्छिमारी नौका समुद्रकिनारी नांगरून ठेवल्या आहेत. उरण तालुक्यातील मोरा बंदर, करंजा बंदर, दिघोडे येथे हजारो नौका सध्या विसावा घेत आहेत. 1 जून ते 31 जूलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीला बंद असते. उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय चालतो. त्यामुळे येथील सर्व नौका आता किनाऱ्यावर आल्या आहेत.

जून-जूलै हा महिना माशांचा प्रजननाचा असतो. तसेच या काळात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे 1 जून ते 31 जुलैदरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर या काळात बंदी असते. या काळात मच्छिमार मासेमारी न करता होड्यांची दुरूस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात. राज्यात 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपैकी जो दिवस आधी येईल त्यादिवशी मासेमारीवरची बंदी उठवली जायची. इतर राज्यातली बंदी 1 ऑगस्टला उठवतात. त्यामुळे बाहेरचे मच्छिमार राज्यात येऊन व्यवसायाला सुरुवात करायचे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांचे नुकसान होत होते. त्यामुळे देशभरातल्या सर्वच किनारपट्टी भागातल्या बंदी कालावधीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाकडून 1 जून ते 31 जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आला आहे.

राज्यात 15 लाखांच्या कुटूंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. महाराष्ट्रात सुमारे 4 लाख 68 हजार मेट्रीक टन मासळी पकडली जाते. उरण तालुक्यातही मच्छिमारांची संख्या जास्त आहे. करंजा, मोरा, दिघोडे, हनुमान कोळीवाडा, आवरे या गावातील अनेक मच्छिमार खोल समुद्रात जाउन मच्छिमारी करतात. मात्र, आता दोन महिन्यांच्या विश्रांतीसाठी सर्व नौका सध्या मोरा, करंजा, दिघोडा या बंदरावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.