
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
समुद्रात बेकायदेशीरपणे आणि अनैसर्गिक साधनांच्या आधारे बेसुमार मच्छिमारी करून समुद्रातील मासळीचे संतुलन बिघडवणाऱ्या मच्छिमारी नौकांवर मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उचलल्याने बेकायदा मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांचे धाबे दणाणले आहेत. रायगडचे सहाय्यक मत्स आयुक्त अभयसिंग शिंदे इनामदार आणि परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी रविवार संयुक्तपणे समुद्रात धडक कारवाई करून एका एलईडी नौकसह 12 बोटींवर कारवाई केली. यावेळी या बोटींवरील मोठ्या प्रमाणात अवैध मच्छिमारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. कारवाई केलेल्या बोटीमध्ये उरणच्या करंजा येथील बोटींची सख्या अधिक असल्याचे समजते.
समुद्रात मासळी मिळत नाही त्यात अनेक मच्छिमार एलईडी आणि पर्ससीन मासेमारी करून समुद्रातील मासे ओरबडून काढतात. त्यामुळे पारंपारिक मच्छिमारांना मासळी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या अनैसर्गिक मच्छिमारी विरोधात पारंपारिक मच्छिमारांनी अनेक वेळा मत्स्य विभागाकडे तक्रारी करून अशा प्रकारची मासेमारी बंद करण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणूका जाहीर होण्यापूर्वी पारंपारिक स्थानिक मच्छिमारांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन एलईडी व पर्ससीन मासेमारी बंद करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर रविवारी रायगडचे सहाय्यक मत्स्य आयुक्त अभयसिंह शिंदे व परवाना अधिकारी स्पप्नील दाभणे यांनी गस्ती नौका घेवून मांडवा जवळच्या भर समुद्रात कारवाई केली. यावेळी समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या 16 नौका तपासण्यात आल्या. यामध्ये एका बोटीमध्ये एलईडी मासेमारीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यामध्ये 13 एलईडी पॅनल, 200 वॅटचे 4 बल्ब, 3 महागडे सबमर्सिबल बल्ब, फिशिंग लॅब, इन्व्हर्टर, जनरेटर आणि बटन आणि वायरींग मोठ्या प्रमाणात आढळून आले. गस्ती पथकाने हे सगळे साहित्य जप्त केले आहे. तसेच पर्ससिन मच्छिमारी करणाऱ्या आठ बोटी आणि दोन ट्रॉलर्स वरील साहित्य जप्त करण्यात आले. एलईडी मच्छिमारी करणारी नौकी ही उरण करंजा येथील हर्षल मच्छिंद्र नाखवा यांच्या मालकीची आहे.
एलईडी व पर्ससिन मच्छिमारी करण्याला कायद्याने बंदी असून सुद्धा या बोटी तशाप्रकारे मच्छिमारी करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती आयुक्त मत्स्यव्यवसाय सहाय्यक अभयसिंह शिंदे इनामदार यांनी दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सूरू राहतील. या पकडलेल्या बोटींवर अलिबाग तहसिलदारांतर्फे कायदेशिर कारवाई केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.





























































