
केळं हे असं फळ आहे जे बारमाही आहे. थंडीच्या दिवसात केळं खाण्याचे विशेष महत्त्व आहे. बऱ्याच जणांना असे वाटते की, या दिवसात केळं खाल्ल्याने सर्दी होते किंवा आजारपण येऊ शकते. त्यामुळे काही जण या ऋतुत केळं खाणं टाळतात, पण केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व सी, फायबर, जीवनसत्त्व बी6, मँगनीज आहे. शिवाय ते फॅट फ्री असून कोलेस्ट्रॉल फ्रीसुद्धा आहे. त्यामुळे केळं खाणाऱ्या व्यक्तिला ऊर्जा मिळते. पाहूया हिवाळ्यात केळं खाण्याचे फायदे.
केळं जीवनसत्त्व बी6चा उत्तम स्त्रोत आहे. एक मध्यम आकाराचं केळं दिवसभरात खाल्लं तर शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्व बी6 ची गरज 25 टक्के पूर्ण होऊ शकते. जीवनसत्त्व बी6 मुळे शरीरात लाल पेशी तयार होतात. कर्बोदके आणि चरबीचे ऊर्जेमध्ये रुपांतर होते. गरोदर महिलांनाही या जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी जीवनसत्त्व सी आवश्यक असते. साधारणपणे संत्र आणि आंबट फळांमध्ये जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असते. त्याचप्रमाणे केळंसुद्धा शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्व ‘सी’ची कमतरता भरून काढते.
केळ्यात असलेले मँगनीज त्वचेकरिता फायदेशीर असते. पोटॅशियममुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते शिवाय रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे दररोज एक केळं खाणे सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे. केळ्यात सोडियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे लो सोडियम आणि हाय पोटॅशियम यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
केळं खाल्ल्याने शारीरिक उत्साह आणि ऊर्जा यामध्ये वाढ होते. केळ्यामध्ये सुक्रोस, फ्रुक्टोस आणि ग्लुकोज हे तीन नैसर्गिक साखरेचे प्रकार आहेत. त्यामुळे शरीराला फॅट फ्री, कोलेस्ट्रॉल फ्री एनर्जी मिळते.
केळं खाण्याची योग्य वेळ कोणती ?
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असतात. पिकलेलं केळं चवीला कमी गोड असतं. तसेच ज्या केळ्याच्या सालीवर काळे डाग असतात. ते केळं पूर्ण पिकलेलं असतं. हे केळं खाणं जास्त फायदेशीर आहे. कारण ते पचायला हलकं असतं. पिकलेलं केळं खाल्ल्याने एनर्जी बूस्ट व्हायला मदत होते. प्रत्येक वयाच्या व्यक्तिला केळं खाणं आवश्यक आहे. लहान मुलं, अॅथलीट्स यांनी सकाळी नाश्त्यावेळी केळं खाल्ल्याने पचनक्रियेतील अडथळे दूर व्हायला मदत होते.


























































