
तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका मंदिरात उत्सवादरम्यान चक्क मानवी अवशेष हातात घेऊन डान्स केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वीरवनल्लूर येथील सुदलाईमादा स्वामी मंदिरातील कोडाई उत्सवादरम्यान 6 जून रोजी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले.
कोडाई उत्सवादरम्यान समाकोट्टई वेत्तई म्हणून ओळखल्या जाणारे पारंपरिक अनुष्ठान करण्यात आले. या विधीचा भाग म्हणून पाचही पुरूष स्मशानात गेले आणि अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवयवांचे अवशेष घेऊन आले. यानंतर त्यांनी हे अवशेष ग्रामदेवतेला अर्पण म्हणून धार्मिक नृत्य केले.
या सर्व विधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर तिरुनेलवेली पोलिसांनी तात्काळ अॅक्शन मोडमध्ये येत भारतीय न्याय संहिता कलम 270, 272, 301 आणि तमिळनाडू सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.