
सामना प्रतिनिधी । जालना
जालना शहरात कट रचून दरोडा टाकणारे 5 अट्टल दरोडेखोर सदर बाजार पोलिसांनी गजाआड केले. यावेळी पोलिसांनी पडोळ , सोपान औताडे, सचिन मोरे, विश्वजीत साळवे, गणेश पडुळ यांना अटक केली असून, त्यांच्याकडून वाहन, चाकु व रोख 90 हजार जप्त करण्यात आले.
जालना शहरातील बसस्थानक रोडवरील दिपक वाईन शॉप येथून बालामुल्लू मेकला व जीवन शन्नी गरम हे दोघे मोटार सायकलवर दिवसभराचा गल्ला 4 लाख रूपये घेवून वाईन शॉप मालक जगदीश खट्टर यांच्या घरी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता जात होते. बालाजी कॉम्प्लेक्स जवळ एका मोटार सायकलवरून 3 अज्ञात चोरट्यांनी बालामुल्लू मेकला यांचा पाठलाग करून, बालाजीगल्लीत चाकुचा धाक दाखवत त्यांच्याजवळील पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतली व तिघे फरार झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यात 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सराईत गुन्हेगार गणेश पडोळसह वरिल दोघांना अटक केली. सदरचा गुन्हा विश्वजीत चक्रधर साळवे, गणेश विष्णु पडुळ यांच्या साह्याने नगर जिल्ह्यातील इतर 2 गुन्हेगारांना बोलावून रेकी केला. सदरहू आरोपींनी वरील गुन्हा कबुल केला असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.





























































