पोटच्या 3 मुलांचा गळा घोटला, पत्नीला संपवलं; नंतर स्वतःला विजेचा धक्का लावून घेत मृत्युला कवटाळलं, मथुरेत हसत्या-खेळत्या कुटुंबाचा करुण अंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका 35 वर्षीय तरुणाने तीन लहान मुलांसह पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केली. ही घटना महावन पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खप्परपूर गावात मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

मनिष जाटव (वय – 35), सीमा (वय – 32), हनी (वय – 5), प्रियांशी (वय – 4) आणि पंकज (वय – 2) अशी मृतांची नावे आहेत. सुरुवातीला पाचही जणांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनिषने आधी आपल्या तिन्ही मुलांचा गळा दाबला, त्यानंतर पत्नीच्या डोक्यात जड वस्तू घालून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःला विजेचा धक्का लावून घेत आत्महत्या केली.

पोलिसांना मनिषच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडला आहे. हा व्हिडीओ त्याने मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केला होता. यामध्ये त्याने आपण आत्महत्या करत असल्याचे आणि यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे. असाच मजकूर त्याने खोलीच्या भिंतीवरही लिहिला होता आणि एक सुसाईड नोटही पोलिसांना घरातून मिळाली आहे.

दरम्यान, एडीजी अनुपम कुलश्रेष्ठ, जिल्हा दंडाधिकारी सीपी सिंह आणि एसएसपी श्लोक कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासात असे समोर आले आहे की, मनिष गेल्या तीन वर्षांपासून काही अघोरी प्रथांमध्ये सामील होता. त्याने अलीकडेच 12.5 लाख रुपयांची जमीन विकली होती. या गोष्टींचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

…अन् खळबळ उडाली

मनिषचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला होता. तो शेती करत होता. त्याचे दोन भाऊ त्याच गावात वेगळ्या घरात राहतात. सकाळी नेहमीप्रमाणे घरातून कुणीही बाहेर आले नाही म्हणून मनिषचा भाऊ तिथे गेला तेव्हा ही घटना समोर आली. मनिषच्या भावाने भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला आणि खोलीचा दरवाजा तोडला, तेव्हा पाचही जणांचे मृतदेह आढळून आले. याबाबत सीमाच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, घटनेच्या एक दिवस आधीच आपल्या मुलीला आणि जावयाला भेटले होते. त्यांच्यात काही वाद किंवा समस्या असल्याचे अजिबात जाणवले नव्हते. दरम्यान, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होईल, असे एसएसपी श्लोक कुमार यांनी सांगितले आहे.