
सामना प्रतिनिधी । ठाणे
मुंब्य्रातून दोन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱया टोळीला शीळ – डायघर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अपहृत मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून अपहरणानंतर ही टोळी मुलांना विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीने आतापर्यंत किती मुलांचे अपहरण केले, अपहरण केल्यानंतर या मुलांना कोणाला विकले, त्यांच्या अवयवांची तस्करी केली का, याबाबत शीळ डायघर पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे लवकरच याबाबत मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागात दोन दिवसांपूर्वी दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते. या मुलाचे अपहरण करताना एका महिलेने त्या अपहरणकर्त्याला पाहिले होते. त्यानंतर या महिलेने त्याची माहिती शीळ-डायघर पोलिसांना दिली. याकेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या पथकाने अपहरणकर्त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून अवघ्या 24 तासांत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यावेळी अपहृत मुलाची पोलिसांनी सुटका केली. अफरीन खान (20), मुबिना शहा (40), अजीम दिवेकर (49), अमिरा दिवेकर (46), मोहम्मद उर्फ अब्दुल खान अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना मुंब्रा व शिळफाटा येथून अटक करण्यात आली.
मृतदेह शोधण्यासाठी जमीन खोदली
आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांना त्यांच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. त्यातून आरोपींनी अपहृत मुलांचे मृतदेह मुंब्य्रात पुरल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र या माहितीची शहानिशा करण्यासाठी मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागात खोदकामाला सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत 10 ते 15 फूट खणल्यानंतर कोणतेही मृतदेह हाती न लागल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. मात्र ही अफवा असून या ठिकाणी एकही मृतदेह सापडला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी सांगितले.
























































