गटार साफ करताना विषारी वायूने 5 जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्लीच्या मोती नगर भागात एका रहिवासी सोसायटीत गटार साफ करण्यासाठी गेलेल्या 5 मजूरांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मृत कामगारांचे हे काम नव्हतेच. कुठल्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय त्यांना या गटाराची सफाई करण्यास सांगितले आणि त्यात त्यांचा मृत्यू ओढवला.

कॅपिटल ग्रीन डीएलएफ ने के.पी. टॉवर सोसायटीत सीवर ट्रीटमेंट प्लांटच्या सफाईसाठी रविवारी दुपारी सहा कर्मचार्‍यांना पाठवले होते. हा प्लांट सहा मीटर खोल होता. हे सहा कर्मचारी या प्लांटच्या सफाईसाठी खाली गेले. प्लांटमध्ये खूप दुर्गंधी असल्याने प्रदीप नावाचा कर्मचारी बाहेर आला. पण बराच वेळ झाला तरी आपले सहकर्मचारी बाहेर न आल्याने त्याला शंका आली. दोन तासानंतर प्लांटच्या मुकादमाला प्लांटमध्ये पाच कर्मचारी बेशुद्ध अवस्थेत आढळले. सर्व कामगारांना इस्पितळात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

बचावलेल्या प्रदीप ने सांगितले की “या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचे हे कामच नव्हते. हाऊस किपींग आणि पम्प चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. खागजी कंपनींमध्ये कामावरून काढून टाकण्याची भिती असल्याने त्यांनी हे काम स्विकारले. सफाई करण्यासाठी आम्हाला कुठल्याच प्रकारची सुरक्षेची साधने दिली गेली नव्हती. थोडेसे काम आहे करून टाका असे शिफ़्ट इनचार्जने सांगितले.”

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दिल्लीत गेल्या २४ वर्षात अशा प्रकरणात 93 जणांचा मृत्यू झाला आहे. 2017 मध्ये दिल्ली सरकारने सीवर साफ करण्यावरच बंदी घातलेली आहे, तरी खाजगी कंपन्यांकडून अशी कामे करून घेतली जाता आहेत.