ओढ्यात बुडाल्याने आई-वडिलांसह तीन मुलींचा मृत्यू; मुळशीतील कोळवण गावाजवळ दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुणे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेसह तीन मुली आणि पतीचा बुडून कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुळशी तालुक्यातील कोळवण गावानजीकच्या ओढ्यात घडली. पाचही मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत अशी माहिती पौड पोलिसांनी दिली.

शंकर दशरथ लायगुडे (वय 38), पौर्णिमा शंकर लायगुडे (वय 36), अर्पिता शंकर लायगुडे (वय 20), राजश्री शंकर लायगुडे (वय13) आणि अंकिता शंकर लायगुडे (वय12) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्याची नावे आहेत. हे सर्वजण मुळशी तालुक्यातील वडाळी गावचे रहिवासी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोर्णिमा लायगुडे तीन मुलींसह कपडे धुण्यासाठी ओढ्याच्या काठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने त्या ओढ्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी तिन्ही मुली ओढ्यात गेल्या. मात्र, तिघीही मुली पाण्यात बुडाल्या. पत्नी आणि तीन मुली बुडल्याची माहिती शंकर लायगुडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ओढ्यात उतरून पत्नी आणि मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते देखील पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने एकाच कुटुंबातील पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण मुळशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.