
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल स्पष्ट होत असून गेल्या 15 वर्षापासून सत्तेवर आरूढ असणाऱ्या भाजप सरकारला जबरदस्त दणका बसला आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा असून यापैकी 66 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजप फक्त 14 जागांवर आघाडीवर आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला 49 तर काँग्रेसला 39 जागा मिळाल्या होत्या. परंतु या वेळेस मात्र काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसत आहे. मतदारांनी भाजपला डावलल्याचे दिसत असून यामागे कोणती प्रमुख पाच कारणे आहेत पाहुया…
तिकीट वाटप आणि बंडखोरी
निवडणुकीची घोषणा झाल्यापासून गेल्या 15 वर्षापासून सत्तेत असणाऱ्या भाजपमध्ये अंतर्गत असंतोषाचे वातावरण दिसत होते. यामुळे अनेक नेत्यांनी बंडखोरी केली. रायगड येथून तिकीट न मिळाल्याने विजय अग्रवाल यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करून पाहिला परंतु त्यांनी नकरा दिला. यासह रामानुजगंज, बसना, साजा, बिलाईगड यासारख्या ठिकाणी उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला नुकसान सोसावे लागले.
विरोधाची लहर, काँग्रेसला बहर
सलग 15 वर्ष सत्तेर राहिल्याने सत्ताधारी भाजपविरोधात जनमाणसात विरोधाची भावना निर्माण झाली होती. याच मुद्द्यांना हवा देत काँग्रेसने याचे लहरीत रुपांतर केले आणि बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांना उचलून धरत जनतेच्या मनात घर निर्माण केले. काँग्रेसने उचललेल्या या मुद्द्यांना भाजपला प्रत्युत्तर देता आले नाही.
योग्य उमेदवारांनी वानवा
सत्तेत असल्याने भाजपने उमेदवारांच्या निवडीकडे लक्ष दिले नाही त्यामुळे बंडखोरी वाढली. तर काँग्रेसने गेल्या निवडणुकीतील अपयश नजरेसमोर ठेऊन योग्य उमेदवारांना संधी दिली. तसेच काँग्रेसने बूथ लेव्हलवर कार्यकर्त्यांना काम करण्याची तंबी दिली आणि याचा सरळसरळ फायदा निकालात झाला.
घोषणा पत्राचा प्रभाव
निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने जाहीर केलेले घोषणा पत्र काँग्रेसने जारी केलेल्या घोषणापत्राच्या जवळपासही नव्हते. सर्वाधिक शेतकरीवर्ग असलेल्या राज्यात काँग्रेसने सत्तेत येताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येईल अशी घोषणा केली. याचा फायदा मतदानातून झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष
तिकीट वाटपामध्ये झालेल्या घोळामुळे बंडखोरी वाढली आणि त्यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले, याचमुळे निवडणूक प्रचारामध्ये कार्यकर्त्यांची वानवा दिसून आली. बूथ लेव्हलला मजबूत असणारी भाजपने या निवडणुकीत त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले. तर दुसरीकडे बूथ लेव्हलला काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दणकेबाज काम करून विजय खेचून आणला.


























































