
पाच वर्षांच्या मुलावर जगातील पहिले रोबोटिक यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाले. युरिया सायकल डिसऑर्डर नावाच्या दुर्मिळ अनुवांशिक विकाराने ग्रस्त असलेल्या या मुलावर आठ तासांची जटिल रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. एवढ्या लहान वयाच्या मुलावर झालेले हे जगातील पहिलेच रोबोटिक यकृत प्रत्यारोपण असल्याचा दावा डॉक्टरांनी केला.
हरयाणाच्या करनाल येथील सौरभ ग्रोव्हर आणि निकिता कोहली यांच्या पाच वर्षांचा मुलगा गुरकिरीत ग्रोव्हर याच्यावर रोबोटिक यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. मुलाच्या शरीरावर कोणताही कट नाही, छेद नाही, वेदना नाही. त्याच्या आईने काही अंशी यकृतदान केले, तिच्यावरही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉक्टरांचे आभार
निकिता कोहली यांचे पहिले मूल याच दुर्धर आजाराने दगावले होते. डॉ. रेला आणि रुग्णालयातील टीमचे आभार मानताना निकिता कोहली म्हणाल्या की, ‘‘हा कुटुंबासाठी एक चमत्कार होता. गेल्या महिन्यापर्यंत त्यांचा मुलगा सामान्य आहार घेऊ शकत नव्हता. मात्र आता तो नॉर्मल आहे. प्रत्यारोपणानंतर आठव्या दिवशी तो घरी नाचत होता.’’
‘‘दरवर्षी आम्ही आमच्या रुग्णालयात 300 हून अधिक यकृत प्रत्यारोपण करतो. तथापि, जगात पहिल्यांदाच पाच वर्षांच्या मुलावर रोबोटिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रोबोटिक्सचा वापर करून यकृत प्रत्यारोपण करणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रौढांपेक्षा मुलांच्या लहान अवयवांमध्ये रोबोटिक उपकरणे घालणे अधिक आव्हानात्मक आहे. या सर्व घटकांमुळे शस्त्रक्रिया खूप आव्हानात्मक बनली,’’ असे डॉ. रेला यांनी सांगितले.