
लोकलमध्ये स्टंट करून स्वतःसह इतर प्रवाशांच्या जीवितास धोका उत्पन्न करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी यापुढे अशा गुह्यात पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या नव्या कलमाची अंमलबजावजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्टंटबाजांना रोखण्यासाठी आरपीएफने कलम-153ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या स्टंट करणाऱया व्यक्तीला दंड किंवा एक ते तीन महिन्यांपर्यंत शिक्षा होते. स्टंट करणाऱ्या व्यक्तीला आपण काय करत आहोत हे चांगले माहिती असते. त्याच्या या वागणुकीमुळे प्रवासात अन्य प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकत असल्यानेच नवीन शिक्षेची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


























































