माही गिल मुख्यमंत्र्यांना भेटली; मारहाणप्रकरणी मिळाले कारवाईचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मीरारोड इथे सुरू असलेल्या दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया याच्या ‘फिक्सर’ वेब सिरीजच्या शूटींगदरम्यान अभिनेत्री माही गिलला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी चित्रपटाच्या टीमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून टीमने झालेल्या मारहाणीच्या प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या टीममध्ये माही गिल सोहम शहा यांच्यासह टीममधील इतर सदस्यही होते.

मीरारोडमध्ये बालाजी टेलिफिल्म प्रोडक्शनतर्फे सुरू असलेल्या या चित्रीकरणादरम्यान चार मद्यधुंद तरुणांनी मंगळवारी माही गिलसह सेटवरील इतरांनाही मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल साईटवरही व्हायरल झाला होता. तिग्मांशू धुलिया या नावाने असलेल्या एका ट्विटर हँडलवरून एक व्हीडिओ अपलोड करण्यात आला असून यामध्ये सेटवर नेमका काय प्रकार घडला ते क्रू मेंबर आणि माही गिलने सांगितले आहे. ही घटना गंभीर असल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटून माहिती देणार असल्याचे टीमने बुधवारी सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून भेटीची वेळ घेतली आणि गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मद्यधुंद चार गुंडांनी सेटवर येऊन तमाशा केला आणि नंतर त्यांनी क्रू मेंबर तसेच कलाकारांना मारहाण केली असं साकेत सहानी या व्हीडिओमध्ये सांगताना दिसतो आहे. माही गिलकडे अंगुलीनिर्देश करत साकेतने महिलांनाही मारहाण केल्याचं म्हटले आहे. ज्या ठिकाणी हे शूटींग सुरू आहे ती जागा आमची असून तुम्ही इथे शूटींग करू शकत नाही असे म्हणत या गुंडांनी मारहाण केली असा आरोप क्रू मेंबर्सनी केला आहे. मारहाणीनंतर पोलिसांना बोलावण्यात आले तेव्हा पोलिसांनीही आमच्याशी उद्धटपणे वर्तन केले आणि या गुंडांसोबत पोलिसांची हातमिळवणी केली असा आरोपही व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.