राष्ट्रध्वज कसा फडकवावा? वाचा काय आहे नियमावली…

1275

उद्या 15 ऑगस्ट, 2019 हिंदुस्थानचा 73 वा स्वातंत्र्यादिन. उद्या मोठ्या उत्साहाने आणि स्फूर्तीने देशभरात तिरंगा फडकवला जाईल. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. परंतु अनेकदा चुकून, नकळतपणे आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमानही होतो. हे टाळण्यासाठी राष्ट्रध्वज नक्की कसा फडकवावा हे आपल्याला माहिती हवे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता करण्यात आली आहे. ही नियमावली काय सांगते ते पाहूया…

> संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे.

> प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

> ध्वज संहितानुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.

> राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.

> रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

> राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

> ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

> ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या