
अंदमान कोर्टाचे वॉरंट असलेला आरोपी येरवडा पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून पळून गेला होता. त्याला गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली. 26 जानेवारीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. उत्कर्ष बाळासाहेब पाटील (रा. नीलांजली सोसायटी, कल्याणीनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आरोपी उत्कर्ष पाटील याच्या नावाने वॉरंट आले होते. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी येरवडा पोलिसांचे कर्मचारी उत्कर्षला पोलीस ठाण्यात घेऊन आले होते. पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ कर्मचारी आरोपीला अंदमानला घेऊन जाण्यासाठी प्रक्रिया करत होते. आरोपी उत्कर्ष एका हाताने अपंग आहे. थंडीमुळे हात दुखत असल्यामुळे गाडीतील हिटरने ऊब घेण्याचा बहाणा करून तो गाडीत शिरला.
त्यावेळी त्याने त्याठिकाणी उभे असलेले सहायक पोलीस फौजदार मोरे यांना धक्का देऊन खाली पाडले. गाडी सुरू करून त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून गेला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सुरेंद्र बाळा साबळे यांना आरोपीची माहिती मिळाली. आरोपी उत्कर्ष चेन्नईतून मुंबईतील सांताक्रुझ विमानतळावर येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, रूपेश वाघमारे, सुरेंद्र साबळे, यांनी आरोपी उत्कर्षला ताब्यात घेतले. त्यानंतर येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, रूपेश वाघमारे, सुरेंद्र साबळे यांच्या पथकाने केली आहे.

































































