Nanded News – धावपट्टी खराब झाल्याने नांदेडची विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेली नांदेडची विमानसेवा धावपट्टी खराब झाल्यामुळे आजपासून अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2008 पासून आता तिसर्‍यांदा विमानसेवा बंद होणार आहे. देशात झालेल्या मोठ्या विमान अपघातानंतर या ही विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. विमानतळावरील रनवेवर मोठे खड्डे पडले असल्याने ते दुरुस्त करण्याची सूचना शासनाकडे करण्यात आली. मात्र त्यासाठीचा निधी न आल्याने अखेर सुरक्षेच्या दृष्टीने विमान प्राधिकरणाने आजपासून ही विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रनवेची दुरुस्ती व अन्य सोयी सुविधा पूर्ण होईपर्यंत हे विमानतळ आता अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. विमानसेवा बंद झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात नांदेडहून हैद्राबाद, बंगळुरु, आदमपूर, गाझियाबाद (दिल्ली) येथे विमानसेवा सुरु झाली. चार महिन्यापूर्वी नांदेड ते पुणे ही विमानसेवाही सुरु करण्यात आली. रिलायन्स कंपनीने 99 वर्षाच्या लिजवर या विमानतळाची बांधणी केली. गुरुत्तागद्दीच्या काळात 2008 साली दिल्ली, अमृतसर, मुंबई, चंदीगड येथून येणार्‍या शिख बांधवांसाठी सुरुवातीला ही विमानसेवा सुरु करण्यात आली. मात्र दोन वर्षातच ही विमानसेवा बंद पडली.

राजकीय पुढार्‍यांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत नांदेड येथून मार्च 2025 मध्ये अहमदाबाद (भुज), बंगळुरु, गाझियाबाद (दिल्ली), हैद्राबाद याठिकाणी चार दिवस व त्यानंतर पाच दिवस ही विमानसेवा सुरु झाली. या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नांदेड-मुंबई व नांदेड-पुणे या विमानसेवा सुरु करण्याची मागणी झाली. त्यातील नांदेड-पुणे ही विमानसेवा तीन महिन्यापूर्वी सुरुही करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड-पुणे विमानसेवा सुरु झाली. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याच्यावेळी नांदेड विमानतळाच्या हवाई पट्टीवर बिघाड झाल्याने ती हवाईपट्टी तातडीने दुरुस्त करण्यात आली. सर्वच विमान सेवांना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या विमानतळाचे रिलायन्सकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरण करण्यासंदर्भात तीनवेळा बैठका झाल्या. दोनवेळा स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत हे नांदेडला आले. त्यांनी पाहणी केली.

यानंतर 20 मे रोजी हस्तांतरणाच्या संदर्भात महाराष्ट्र विमानतळ कंपनीचे प्रमुख रोहित राहपाडे, निशिकांत देशपांडे, नियोजन अधिकारी भक्ती चितळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता कल्पेश लहीवाल, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी विमानतळाची पाहणी करुन त्यामध्ये असलेल्या त्रुटी व अन्य सुविधाबाबत चर्चा करुन औद्योगिक विकास महामंडळाकडे या विमानतळाचे हस्तांतरण करण्याबाबत पावले उचलली.