
सामना ऑनलाईन, पुणे
झोपडपट्टीतील अरुंद रस्ते आणि बोळांमध्ये प्रचंड वेगाने आलेल्या पाण्याने रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. अचानक घरात पाणी घुसल्याने महिला, लहान मुले, वृद्ध यांची पळापळ सुरू झाली. घरातील सर्व साहित्य आहे तसे सोडून जीव वाचविण्यासाठी नागरिक बाहेर पडले. पाठोपाठ पाण्याचा वेग आणखी वाढला. बघता बघता घरांमधील टीव्ही, फ्रीज, सिलिंडर, कपडे, पेटय़ा, डबे, भांडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहून आली. डोळय़ांपुढे संसार वाहून जात असतानाही हताशपणे बघत बसण्यापलीकडे काहीच करता येत नव्हते.
पाहा या दुर्घटनेचे एक्स्लुझिव्ह फोटो
पाण्याच्या लोंढय़ामुळे सुमारे पाच फुटांचे लोखंडी दुभाजकही पाण्याखाली गेले. रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी, चारचाकी वाहने वाहून गेली. पाण्याचा लोंढा पाहून चालकांनी वाहने थांबविल्याने पुढील अनर्थ टळला.
शहरातून वाहणाऱ्या खडकवासला उजवा कालव्याला दांडेकर पुलाजवळ भलेमोठे भगदाड पडल्यामुळे दांडेकर पूल आणि परिसरात आज सकाळी सुनामीच आली. हाहाकार उडाला. पाण्याच्या लोटात शेकडो घरे, संसार वाहून गेले. रस्त्यांवर पूरसदृश परिस्थिती येऊन दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या. अनेकजण प्रचंड प्रवाह असलेल्या पाण्यात अडकले. वाहतूककोंडी झाली. अडीच ते तीन तास चाललेल्या तांडवाने भयभीत पुणेकरांना पानशेत पुराची आठवण करून दिली. जलसंपदा खात्याचा गलथानपणा आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी एकमेकांना आधार देत या सुनामीतून सुटका करून घेतली.
पुणेकरांवर दुहेरी संकट, आधी पूर नंतर वादळी पाऊस
गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास कालवा फुटण्यास सुरुवात झाली. भरावाला एकदम भगदाड पडल्याने 1172 क्युसेक्स वेगाने वाहणाऱ्या कालव्याचे पाणी सर्व्हे क्रमांक 130 मधील झोपडपट्टीमधून वाहणाऱ्या नाल्यात घुसले. या नाल्याची मोरी कचऱ्याने तुंबल्याने काही क्षणांत हे पाणी सिंहगड रस्त्यावर आले. पाण्याच्या लोंढय़ामुळे सुमारे पाच फुटांचे लोखंडी दुभाजकही पाण्याखाली गेले. रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी, चारचाकी वाहने वाहून गेली. यावेळी रस्त्यावर वाहतूक सुरू होती. प्रचंड पाण्याचा लोंढा पाहून वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून वाहतूक थांबविल्याने पुढील अनर्थ टळला.
सिंहगड रस्त्यावरील हा पाण्याचा लोंढा साने गुरुजी शाळा ते दांडेकर पूल यादरम्यानच्या झोपडपट्टीत घुसला. झोपडपट्टीतील अरुंद रस्ते आणि बोळांमध्ये प्रचंड वेगाने आलेल्या पाण्याने रहिवाशांचा काळजाचा ठोका चुकला. अचानक घरात पाणी घुसल्याने महिला, लहान मुले, वृद्ध यांची पळापळ सुरू झाली. घरातील सर्व साहित्य आहे तसे सोडून जीव वाचविण्यासाठी नागरिक बाहेर पडले. पाठोपाठ पाण्याचा वेग आणखी वाढला. बघता बघता घरांमधील टीव्ही, फ्रीज, सिलिंडर, कपडे, पेटय़ा, डबे, भांडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहून आली. डोळ्यांपुढे संसार वाहून जात असतानाही हताशपणे बघत बसण्यापलीकडे काहीच करता येत नव्हते. पाण्याच्या दाबामुळे 12 फूट उंंच संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे ओढय़ातून येणारे पाणी खालच्या बाजूच्या झोपडय़ांमध्ये घुसल्याने त्या वाहून गेल्या. अनेक घरांच्या भिंती, आरसीसी कोसळले.
दिवस होता म्हणून…
कालवाफुटीची ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या वेळी दांडेकर पूल झोपडपट्टी आणि परिसरातील लोक कामासाठी बाहेर पडले होते. तसेच घरांतील लोकांना पाणी घुसल्याने गोंधळ आणि आरडाओरडा झाल्याने कळले. त्यामुळे बाहेर पळता आले आणि स्थानिकांची मदत मिळाली. दिवस होता म्हणून हे शक्य झाले. हीच घटना रात्री घडली असती तर… अशी भीती अनेकांनी व्यक्त केली.
कालवा दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष
खडकवासला कालव्याची दुरुस्ती हा गेल्या पंधरा-वीस वर्षांतील जलसंपदा विभागाचा सर्वाधिक खाबूगिरीचा विषय ठरला आहे. तीनशे ते चारशे कोटी रुपये खर्च होऊनदेखील हा कालवा ढिसूळ आणि गळतीने जर्जर आहे. दुरुस्ती होऊनही गळती कायम राहिल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे.



























































