आता येणार उडणारी कार, हुंदाई आणि उबरमध्ये करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील विविध शहरांतील वाहतूककोंडीमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. कुणाला मीटिंगसाठी जायचे असते, कुणाला नोकरीच्या मुलाखतीसाठी. लोकलचा खोळंबा झाल्याने, तर कधी ट्रफिक जॅममुळे कामावर लेटमार्क लागतो. अशातच उडणारी कार आली तर…किती बरे होईल. काही मिनिटांतच ऑफिसात पोहोचता येईल. धावपळ होणार नाही…अशी स्वप्ने प्रत्येकजण रंगवायला लागतो. पण, आता अशी उडणारी कार प्रत्यक्षात येणार आहे. हुंदाई आणि उबर या दोन कंपन्या एकत्र येऊन लास वेगासमध्ये 2020 मध्ये होणाऱया सीईसी महोत्सवात या कारचे मॉडेल सादर करण्यात येणार आहे. याबाबतची माहीती हुंदाई कंपनीने लास वेगासमध्ये घेतलेल्या पत्रकार परीषदेत दिली.

अशाप्रकारे उडणाऱया कारसाठी उबरसोबत करार करून सुरुवात करणारी हुंदाई ही पहिली ऑटोमोटिव्ह कंपनी ठरणार आहे. या एअर टॅक्सी मॉडेलचे नाव हुंदाई S-A1 असे असणार आहे. हुंदाई कंपनी या कारचे उत्पादन करणार असून उबर या कारसाठी एअरस्पेस सपोर्ट सर्व्हिस, ग्राऊंड ट्रान्सपोर्टेशन कनेक्शन आणि एरियल राइड शेअर नेटवर्क उपलब्ध करून देणार आहे. या नव्या उत्पादनाच्या माध्यमातून दोन्ही कंपन्या एअर टॅक्सीच्या टेक-ऑफ आणि लॅण्डिंगसाठी एकत्र काम करणार आहेत.

ताशी 290 किलोमीटर वेगाने उडणार

लास वेगासमध्ये सादर करण्यात येणाऱया उडणाऱया हुंदाई S-A1 चे फुल स्केल मॉडेल आहे. ही कार जमिनीपासून 1 हजार ते 2 हजार फूट उंचावरून उडेल. तसेच ताशी 290 वेगाने उडेल. संपूर्णपणे इलेक्ट्रिक असणारी ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरपर्यंत उडू शकेल. केवळ 5 ते 7 मिनिटांत ही कार चार्ज होईल.

  • कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली असून एयरफ्रेमच्या चारीबाजूंना अनेक रोटर्स आणि प्रोपेलर यांचा प्रयोग करण्यात आला आहे.
  • सुरुवातीला ही कार पायलट चालवेल. काही काळानंतर ऑटोमेटिक उड्डाणासाठी ही कार सक्षम बनवण्यात येईल.
  • कारमध्ये चार प्रवासी बसू शकतील अशी कारची रचना करण्यात आली आहे.