
चारा घोटाळाप्रकरणी आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासह 102 आरोपींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रांचीतील सीबीआय कोर्टात लालूंविरोधात पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील चार प्रकरणांवर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकालही जाहीर केला आहे. मात्र पाचवा निकाल अद्याप बाकी आहे. हा निकाल 15 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह शेकडो जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 139.5 कोटींच्या घोटाळाप्रकरणी 9 वर्षांनंतर 26 डिसेंबर 2005 रोजी लालू प्रसाद यांच्यासह 148 लोकांवर आरोप निश्चित करण्यात आले. सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश एस. के. शशि यांच्यासमोर शेवटचा आरोपी डॉ. शैलेश कुमार याने आज आपला युक्तिवाद पूर्ण केला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यावर 15 फेब्रुवारी रोजी न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे.

























































