नगर जिल्ह्यात पाणीटंचाई बरोबरच आता चार टंचाईचे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर जिल्ह्यात आता पाणीटंचाईचे वादळ घोंगावत असून विविध प्रश्‍न उभे राहिले आहेत. शहरासह जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरीकांवर येवून ठेपली आहे. तसेच खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबर चाराटंचाईही निर्माण झाली असून, जिल्हा प्रशासनाने चाराटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली आहे. त्यासाठी प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील दोन दिवस चांगला पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात काहीसा पाऊस झाला. जुलै महिन्यातही तुरळक पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात ही अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. जून ते ऑगस्टदरम्यान 50 टक्के देखील पाऊस झाला नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकर्‍यांनी खरिपाचा पेरा केला. मात्र, पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या. जुलै व ऑगस्ट महिन्यांतही पाऊस समाधानकारक न झाल्याने अनेक भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. जिल्ह्यात खरिपाचे पाच लाख हेक्टर क्षेत्र आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या मात्र पावसाअभावी तालुक्यात खरिपाच्या पिके जळून गेली, तर काही भागात पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला होता. यंदा कमी पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे शेतकर्‍यांसमोरील अडचणीत आणखीनच वाढ झाली होती. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पावसाची अपेक्षा होती. मात्र, ती देखील फोल ठरली.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने रब्बी हंगामही धोक्यात आला. नगर जिल्हा प्रामुख्याने रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातही दक्षिणेतील तालुके हे रब्बी हंगामाचे तालुके म्हणून ओळखले जातात. पाथर्डी, कर्जत, जामखेड, शेवगाव, श्रीगोंदे व नगर ही तालुके प्रामुख्याने रब्बीची आहेत. कमी पावसाचा सर्वाधिक फटका या तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्यात रब्बीच्या 6 लाख 67 हजार 261 हेक्टर क्षेत्रापैकी यंदा 3 लाख 13 हजार 719 क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. यंदा कमी पावसामुळे खरीप पाठोपाठच रब्बी हंगामातील पिके देखील शेतकर्‍यांच्या हातात आली नाही त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडून गेले आहे.

खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांनी खते व बियाणे मोठा खर्च केला. मात्र, पावसाने दडी मारल्याने हा खर्च देखील वाया गेला आहे. त्यातच ग्रामीण भागात पाण्याची टंचाईबरोबरच चाराटंचाईही निर्माण झाल्याने शेतकर्‍यांवर दुहेरी संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात टँकरची संख्या 403 वर गेली आहे. टँकरबरोबर चार्‍याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. बाजारात सध्या हिरव्या चार्‍याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाव गगनाला भिडले आहेत.त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागातून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. चाराटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने छावण्यासाठी प्रस्ताव मागवले असून, त्यासाठी जिल्ह्यात प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रस्ताव घेणे, छाननी करणे व ते जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करणे हे काम ही समिती करणार आहे. छावण्यांसाठी आलेल्या प्रस्ताव व अर्जाची छाननी होईल. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिल्यानंतर छावण्या सुरू होतील.