धुक्याने लोकलची वाट अडवली! 10 लोकल रद्द, 100 हून अधिक गाडय़ांना लेटमार्क

राज्यात अवकाळी पावसाचा शिडकाव सुरू असताना मुंबईच्या दिशेने येणाऱया खंडाळा आणि कसारा घाटात पहाटे धुके पडत आहे. त्यामुळे त्याचा फटका लांब पल्ल्याच्या एक्प्रेस ट्रेनबरोबरच लोकल गाडय़ांना बसत आहे. आज पहाटेपासून धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यामुळे मध्य रेल्वेवर दहा लोकल सेवा रद्द कराव्या लागल्या तर शंभरहून अधिक गाडय़ांना लेटमार्क लागला. त्यामुळे सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱया चाकरमान्यांची कार्यालय गाठताना दमछाक झाली.

पहाटेच्या सुमारास घाटमार्गावर मोठय़ा प्रमाणात धुके पडत असल्याने देशभरातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱया लांब पल्ल्याच्या गाडय़ा धिम्या गतीने चालवाव्या लागत आहेत. आज सकाळी दहा लोकल रद्द कराव्या लागल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच ऐन गर्दीच्या वेळी शंभरहून अधिक लोकल उशिराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकात प्रवाशांची गर्दी होती.