
आपल्या हिंदुस्थानी लोककलांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा म्हणून एनसीपीएने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
झांजांच्या तालावर पारंपरिक भक्तिपर गायन आणि नर्तनाद्वारे राधा-कृष्णाची स्तुती करणारे ‘मंजिरानर्तन’…तलवारी, भाले, खंजीर अशा विविध शस्त्रांच्या साथीने शारीरिक नियंत्रणाचा आविष्कार असणारा ‘थांग-ता’…आणि हाताने वाद्य वाजवून नृत्याचा ठेका धरणारा मणिपूरचा ‘पांग चोलम’… अशा विविध नृत्यांचा आविष्कार मुंबईच्या एनसीपीएत पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते एनसीपीएने 18 मार्च रोजी भरवलेल्या ‘नृत्यपरिचय’ महोत्सवाचे. या महोत्सवात पवईच्या ग्रीन लॉन्स इंग्लिश हायस्कूलचे 120 विद्यार्थी त्यांचे नृत्य सादर करणार आहेत.
नृत्य शिकण्याची प्रचंड आवड आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे शिकता येत नाही, अशा हौशी वंचित मुलांसासाठी नॅशनल सेंटर फॉर परफार्ंमग आर्टस्ने पुढाकार घेतला आहे. या वंचित मुलांसाठी एनसीपीए मुंबईतील विविध शाळांमध्ये ‘नृत्यपरिचय’ हा सीएसआर उपक्रम गेली पाच वर्षे राबवत आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील विविध शाळांतील वंचित वर्गातील मुलांना वर्षभर नृत्याचे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांचा वर्षाच्या अखेरीस तीनदिवसीय नृत्यपरिचय महोत्सव भरवला जातो. नृत्य ही एक कला असून त्याचे अनेक प्रकार आहेत. तसेच या उपक्रमाचा मुख्य उद्देश कला आणि संस्कृतीचा प्रसार करणे असा आहे तसेच आमच्या या उपक्रमाचा नृत्यशिक्षकांनी लाभ घेऊन त्यातून अनेकांना त्याचा लाभ द्यावा असा आहे. ‘नृत्यपरिचय’ हा एनसीपीएचा सीएसआर उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत मुलांना प्रसिद्ध नृत्यप्रशिक्षकांकडून नृत्य लोककलेचे धडे देण्यात येतात. एवढेच नाही तर या प्रशिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांना नृत्याच्या उगमाशी संबंधित परंपरा आणि प्रथांची माहिती देण्यात येते.
नृत्यप्रशिक्षकांची नृत्य सादरीकरणाची शैली पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नृत्याशी निगडीत आवश्यक ती माहिती घेता येते. मागील वर्षी दोन यशस्वी कार्यक्रमांसोबत एनसीपीए सध्या अग्रगण्य कंपन्यांसमवेत मुंबईतील सहा शाळांमध्ये प्रकल्प राबवत आहे. या कार्यक्रमात पारंपरिक मणिपुरी नृत्याचा दुसरा टप्पा-मंजिरानर्तन पेश करण्यात येईल, यामध्ये झांजांच्या तालावर पारंपरिक भक्तिपर गायन आणि नर्तनाद्वारे राधा-कृष्णाची स्तुती केली जाते. थांग-ता म्हणजे तलवार-भाल्याची कला हा ईशान्य हिंदुस्थानातील मणिपूरमधील पारंपरिक मार्शल आर्टप्रकार, थांग-तामध्ये तलवारी, भाले, खंजीर इ. विविध शस्त्र श्वासाच्या लयीवर नाजूक हालचालींच्या साथीने शारीरिक नियंत्रणाचा आविष्कार दाखवतात. हा मणिपूरच्या महान वीर परंपरेचा भाग आहे. या दिवशी मणिपूरचा आगळावेगळा शास्त्रीय नृत्यप्रकार पांग चोलमदेखील पाहायला मिळेल. हे नृत्य सामान्यपणे रास लीलेसारखे आहे. या प्रकारामध्ये नर्तक पांग म्हणजे हाताने वाद्य वाजवून नाच करतात. कार्यक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी मान्यताप्राप्त नृत्य महोत्सवात आपल्या शिक्षकांसमवेतही नृत्य प्रस्तुती करीत असल्याची माहिती एनसीपीएचे नृत्यप्रमुख स्वप्नोकल्पा दासगुप्ता यांनी सांगितले.


























































