लोक दिवाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

आपण दिवाळी एका ठराविक साच्यात साजरी करतो. पण लोककलावंतांची लोक दिवाळी न्यारीच असते.
वन संस्कृती, ग्राम संस्कृती आणि दिवाळी यांचे नाते अतूट असते. दिवाळी म्हणजे सृजनाचा उत्सव. दिन दिन दिवाळी। गाई म्हशी ओवाळी। गाई-म्हशी कोणाच्या। लक्षुमनाच्या।। परंपरेने चालत आलेले हे मौखिक गीत आजही आठवते. आश्विन महिन्यात नवीन पिके आलेली असतात. ठाणे जिह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा या आदिवासीबहुल भागात ढोल नाच, तारपा नाच, बोहाडा, थाळ वादन, गौरी नाच, टाकळा नाच आदी प्रकार साजरे होतात. या आदिवासी कलावंतांच्या दिवाळीबद्दल त्यांच्यात काम करणारे राजन वैद्य म्हणाले, ‘आदिवासींचा आनंदोत्सव दसरा-दिवाळी’च्या निमित्ताने सुरू होतो तो थेट अक्षय तृतीयेपर्यंत टिकतो. दिवाळी आणि होळी हे सण आदिवासींसाठी महत्त्वाचे असतात.

गाववेशीच्या बाहेर झाडीत दोनतीन फूट उंचीच्या चपटय़ा लाकडावर किंवा दगडावर वाघाची मूर्ती कोरतात. त्याच्या आजूबाजूला इतर लहान मूर्ती असतात. सर्वांना शेंदूर लावला की, त्यांच्यात देवत्व येते. दिवाळीत वाघ्यापुढे तेलातुपाचा दिवा लावतात, नारळ फोडतात, बकऱयाचा बळी देतात. खोबरे सगळय़ांना प्रसाद म्हणून वाटले जाते. दिवाळीत तारपे वाजवून रात्रभर नृत्य होते. घुंगरू लावलेल्या काठय़ांसह पुरुष-महिला हा नाच करतात. काही ठिकाणी गाव दिवाळीत सोंगाडय़ांचा खेळ होतो.

ग्राम संस्कृतीत दिवाळीचा प्रारंभ दसऱयापासूनच होतो. दसऱयाआधीच्या नवरात्रात सृजनाची, शक्तीची पूजा घटस्थापनेच्या रूपाने होते.दसरा-दिवाळीत कृषीप्रधान संस्कृतीत सुगीचे दिवस सुरू होतात. ग्राम जीवनात वासुदेव, गोंधळी, भुत्ये, वाघ्ये-मुरळय़ा, नंदीबैलवाले, पांगूळ हे याच दिवसांत फिरस्तीला बाहेर पडतात. दसरा-दिवाळीत कुडाळच्या मंदिरात चित्रकथी कार्यक्रम आयोजित होत असल्याचे परशुराम गंगावणे या चित्रकथी-बाहुलेकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पिंगुळी येथे चित्रकथी, बाहुलेकर, पांगूळ, नंदीबैलवाले, राधानाचवाले यांची घराणी असून दसरा-दिवाळीनंतर हे लोकसंस्कृतीचे उपासक फिरतीसाठी बाहेर पडतात.

दसऱयापासून जेजुरीच्या खंडोबाचे उत्सव सुरू होतात. दसऱयाआधीच्या नवरात्रात जेजूरगडावर संगीत बारीतील कलावंतांची रात्री हजेरी असते. तेथे रात्रभर लावण्यांचा कार्यक्रम असतो असे रोशन सातारकर यांची कन्या नंदा हिने सांगितले. वाघ्या-मुरळ्यांचे  जागरणाचे फडही दसरा-दिवाळीत रंगतात. पुण्याच्या कसबा पेठेतील माणिकबाई रेणके या पारंपरिक मुरळी म्हणाल्या, ‘‘दसरा-दिवाळीपासून थेट लग्नसराईपर्यंत खंडोबाच्या जागरणाचे कार्यक्रम सुरू असतात.’

खंडोबाच्या पदांमध्ये एक शिलंगणाचं पद आहे ते असं-

आश्विन महिना प्रातःकाली

न्हाती कऱहेच्या तीरी

फुलपुष्प वरचे वरी

भरून कऱहेचे पाणी गंगेच्या कावडी

रात्रंदिन माझ्या दिसतो नयनी

बसतो माझ्या मनी।

चल जेजुरीला साजणी

चल पठारला साजणी

ग्राम संस्कृतीत दिवाळीत एकीकडे क्षेत्रपाल देवतांचा लोकदैवत संप्रदाय लोकपुरोहितपणासाठी सज्ज झालेला असतानाच भक्ती संप्रदायाची दिवाळी सुरू होते. पहाटे मंदिरात काकडा सुरू होतो. संतसाहित्याचा अभ्यास करणारे संभाजीनगरचे प्राध्यापक डॉ. दत्तात्रय डुंबरे म्हणाले, ‘कार्तिकी एकादशीला आळंदीची यात्रा असते. तत्पूर्वी आश्विनात गावोगावच्या मंदिरात काकड आरती सुरू होते. हरिपाठाची भजने सुरू होतात, संतांनी दिवाळीचे वर्णन अतिशय अचूक शब्दांत केले असून संतांची दिवाळी ही अध्यात्म ज्ञानाच्या उदयाची दिवाळी आहे.

संत तुकाराम, ज्ञानेश्वरच्यां या ज्ञानाच्या दिवाळीचे दर्शन कीर्तन, भजन, भारुडात होते. संतांच्या या दिवाळीसोबतच तंतांच्या दिवाळीचे दर्शन घेऊया.

तंत म्हणजे शाहीर. रामजोशी, सगनभाऊ, प्रभाकर, अनंत फंदी, होनाजी बाळा या पेशवाईतल्या शाहिरांनी म्हणजे तंतांनी लावणीची परंपरा जोपासली. त्यानंतर हैबती, दगडूसाळी, पठ्ठेबापूराव, भाऊ फकुड यांनी गण, गौळणी, लावण्यांची रचना केली. ढोलकी फडाच्या तमाशाने, संगीत बारीच्या तमाशाने ही परंपरा पुढे चालविली. ढोलकी फडाच्या तमाशा क्षेत्रातले सध्याच्या काळातले आघाडीचे नाव म्हणजे विनोदसम्राट मास्टर रघुवीर खेडकर. ते म्हणाले, ‘‘तमाशा कलावंतांची दिवाळी पूर्वी तंबू, राहुटय़ांमध्येच असे. साधारणतः दहा-बारा वर्षांपासून मुंबईत तमाशा कलावंतांच्या दिवाळीच्या हंगामाची परंपरा खंडित झाली. ध्वनिक्षेपकासाठी रात्री 10 पर्यंतची परवानगी आणि तमाशा कलावंतांच्या जुन्या गाडय़ांना मुंबईत बंदी यामुळे मुंबईकर दिवाळीत तमाशाला पारखा झाला, तर आम्हीही मुंबईकर तमाशा रसिकांपासून दुरावलो गेलो. त्यापूर्वी शाळांची मैदाने मुंबईत तमाशाला मिळायची. साधारणतः 15 राहुटय़ा परळच्या सेंट झेवियर मैदानात उतरायच्या. काळूबाळू, विठाबाई, कांताबाई सातारकर, मिका-भिमा, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक पुणेकर असे नामांकित फड या मैदानात उतरायचे. तंबू-राहुटय़ांपुढे रांगोळी काढली जायची. त्याआधी तंबू-राहुटय़ा शेणाने सारवल्या जायच्या. फुलबाजे, फटाके उडवायचो. तमाशा रसिक मिठाई, दिवाळीचा फराळ, कपडे घेऊन यायचे. दिवाळीत रात्री तमाशे रंगायचे. हे सर्व वैभव आता संपले. अनिता, अलका, मंदा, मोहिनी या माझ्या भगिनी दिवाळीत भाऊबीजेला हमखास ओवाळतात.’’

लावणी क्षेत्रातील कलावती, अकलूजच्या लावणी नृत्य स्पर्धेत सलग तीनवेळा प्रथम पुरस्कार प्राप्त झालेल्या प्रमीला लोदगेकर सूर्यवंशी म्हणाल्या, ‘‘घटस्थापनेत मी तुळजापूरच्या मंदिरात ध्यानधारणेला बसते. कोजागिरीपर्यंत उपवास करते. दिवाळीत मुलाबाळांची भेट होते. इतर दिवसांत सतत लावणीचे कार्यक्रम. ‘सोनंनाणं नगं। दागदागिनं नगं। इस्वासानं गळय़ात माझ्या बांधा डोरलं। या लावणीची आठवण आजही होते.’ लोककलावंतांना दिवाळीचे महत्त्व अधिक वाटते. कारण त्यांच्या आयुष्यातले ते आनंदाचे क्षण आणि सुगीच्या हंगामाचा प्रारंभ!

[email protected]