माफक खाणं

863

>> शेफ विष्णू मनोहर

प्राजक्ता माळी. प्रचंड मत्स्यप्रेमी. पण सध्या शिवराक झाली आहे. त्यामुळे बटाटे वडा, साबुदाणा खिचडी हे चमचमीत पदार्थ सुरू आहेत.

प्राजक्ता माळी सध्या सगळय़ात व्यस्त अभिनेत्री, पण तरीही वेळात वेळ काढून ती लंच डेटसाठी तयार झाली. आमची भेट वेळेअभावी पुण्यात आमच्या दोघांचा मित्र गौरव दुवेदी याकडे ठरली. गौरवने आमच्या आवडीचे पदार्थ तयार केले होते. मला आवडणारे दडपे पोहे, चण्याची भेळ, तांदळाची उकड तसंच तिला आवडणारा बटाटा वडासुद्धा बनविला होता. त्याचबरोबर ब्रेड बटर, चहा, कॉफी असा मेनू होता. खरं म्हणजे गौरवची ओळख प्राजक्ताने आठ वर्षांपूर्वी मला सुगरण कार्यक्रमाच्या सेटवर करून दिली होती.

या सगळय़ा आठवणी काढत असताना प्राजक्ता म्हणाली, मी जेव्हा पुण्याला राहायची तेव्हा शोकरिता पुण्याहून मुंबईला जाणं-येणं करायची. जाता-येताना ‘दत्त स्नॅक्स’चा बटाटा वडा आणि उपवासाची खिचडी खाल्ल्याशिवाय तिची मुंबईतील ट्रीप पूर्ण होत नसे आणि आजचा मेनू पाहिल्यावर मी गौरवला म्हटलं, तिच्या आवडीचे मासे कुठे आहेत? तर मला आश्चर्याचा धक्का, तो यासाठी की, ती म्हणाली मासे खाणं सोडलं.  कारण आम्ही शूटिंग करत असताना नॉनव्हेज असलं की तिला फार आनंद व्हायचा. तोपर्यंत आमचे दडपे पोहे संपून गरम बटाटे वडे आले होते. गौरवची बटाटे वडे बनविण्याची पद्धत वेगळी होती. बटाटय़ाचा कच्चा मसाला तयार करून बटाटे वडे गोल तळल्यानंतर अर्धे तळले असताना ते बाहेर काढायचे नंतर हिंगाच्या पाण्यात बुडवून हाताने चपटे करायचे व नंतर मंद आचेवर खमंग तळायचे. यावर गौरवची तारीफ केली असताना तो म्हणाला, ही रेसिपी मला प्राजक्तानेच दिलेली आहे. पुढे प्राजक्ताला विचारलं की, नॉनव्हेज का सोडलं? त्यावर ती म्हणाली, कुठलंही गतप्राण झालेलं शरीर काही काळानंतर डिकम्पोस्ट व्हायला सुरुवात होते. असंख्य प्रकारचे बॅक्टेरीया त्यात निर्माण होतात. मग अशा प्रकारचे पदार्थ आपण सेवन करून आपल्या शरीरात का घ्यायचे? हे जेव्हा लक्षात आलं तेव्हापासून मांसाहार सोडला. आता शाकाहारातही तेवढीच मजा येते. बाहेर देशात गेल्यावर मी माझं खिचडीचं साहित्य घेऊन जाते. दही,  बटर कुठेही सहज उपलब्ध असतं. त्यामुळे इतर देशांत खाण्याचा प्रश्न येत नाही. जेव्हा तिला विचारलं की आवडतं रेस्टॉरेंट कुठलं तर ती म्हणाली, ज्यावेळी नॉनव्हेज खायचे तेव्हा गोव्यातील एक ठिकाण प्रचंड आवडत असे, त्याचं नाव ‘रीस’ तिथला मासा इतका छान असतो की, कोल्हापूरला शूटिंग असलं की तेव्हा तिथे अवश्य भेट देत होती. नंतर तिला म्हटलं, तू स्वतःला मेन्टेन कसं करते? त्यावर ती म्हणाली, मी मुळात भरतनाटय़म् करते तो व्यायामाचाच प्रकार आहे. याशिवाय रोज एक तास योगासुद्धा करते. त्यामुळे मी फिट असते. कुठलाही प्रकारचा डाएट करत नाही, पण मोजकंच खाते.

स्वयंपाक करायला आवडतं का हे विचारल्यावर तिचं उत्तर होतं गरजेपूरतं जेवण मी तयार करून घेते. ज्यावेळी आम्ही शूटिंग करायचो त्यावेळी शॉट संपला की प्लेट घेऊन मेकअप रूममध्ये जायची, त्यात नॉनव्हेज असेल तर विचारूच नका! आता बटाटे वडेसुद्धा संपले होते आणि गौरवने आमच्या समोर पान मिल्क शेक आणून ठेवले. मिल्क शेकचा आस्वाद घेत घेत आम्ही आमच्या गप्पा आवरत्या घेतल्या.

गोवन फिश करी

साहित्य – पाऊण किलो पापलेटचे तुकडे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या, 1 वाटी नारळाचं दूध, 4 चमचे खोबरेल तेल, मीठ चवीनुसार.

मसाला –  10-12 लाल मिरच्या, 4 चमचे धने, 1 चमचा जीरे, 2 चमचे किसलेलं आलं ,  1 बारीक चिरलेला लसूण, 2 चमचे चिंचेचा कोळ, 1 चमचा हळद. मसाल्याचे सर्व साहित्य पाणी घालून बारीक वाटून घ्यावं.

कृती – पापलेटच्या तुकडय़ांना मीठ, हळद लावून 5-10 मिनिटं बाजूला ठेवावं. खोबरेल तेलावर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यावर टोमॅटो आणि मसाला ढवळावं. त्यात पाणी आणि नारळाचं दूध घालून थोडं पातळ करावं (जास्त पाणी घालून नये) आणि मिश्रणाला उकळी आणावी. यात माशाचे तुकडे, हिरव्या मिरच्या, मीठ घालावं आणि 5-7 मिनिटं शिजवावं.

मिल्क पान शेक

साहित्य – अर्धा लिटर थंड दूध, 2 बंगला पाने, चिमूटभर थंडाई, 4 चमचे साखर,  2 चमचे बडीशेप, पाव चमचा चमनबहार, दोन चमचे व्हॅनीला आईस्क्रीम, 3 चमचे  मिल्क पावडर.

कृती – आईस्क्रीम सोडून सगळं जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करा. नंतर फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटे थंड करून सर्व्ह करते वेळी त्यावर एक आईस्क्रीमचा स्कूब व बारीक चिरलेल्या पानाचे काप घालून सर्व्ह करा.

बेक्ड बटाटा वडा

साहित्य – 1 वाटी उकडलेले आलू, 1 वाटी बेसन, मैदा पाव वाटी, हळद, तिखट चवीनुसार, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, 5-6 हिरव्या मिरच्या , 4 चमचे आलं-लसूण, पाव वाटी कोथिंबीर, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, साखर

कृती – सर्वप्रथम उकडलेल्या बटाटय़ाची भाजी बनवून त्याचे चपटे गोळे करून घ्या. त्यानंतर बेसनामध्ये थोडं पाणी, मीठ, मैदा व तेल घालून चांगले फेटून घ्या. मायक्रोव्हेवच्या प्लेटला तेल लावून त्यावर एक गोल साचा ठेवा. थोडे बेसनाचे मिश्रण घालून त्यावर मसाल्याचा चपटा गोळा ठेवा. वरून परत बेसन घाला. अशा प्रकारे वडे बनवून मायक्रोव्हेवर तीन ते चार मिनिटे बेक करा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या