मत्स्यप्रेमी

380

>> विष्णू मनोहर

डॉ. सलील कुलकर्णी. गवय्याप्रमाणे तो मत्स्याहाराबाबत खवय्याही आहे.

आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमामुळे रसिकांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकणारी जोडी म्हणजेच सलील कुलकर्णी व संदीप खरे. यापैकी संदीप खरे यांच्याबरोबर आपण बातचीत आधीच केलेली आहे, सलील कुलकर्णीबरोबर काही योग येत नव्हता. शेवटी तो योग नागपुरातच आला. काही कार्यक्रमानिमित्त सलील आला असताना त्याला ‘लंच डेट’बद्दल विचारलं तर वेळेअभावी आमची डेट काही जमू शकली नव्हती. मग नाटय़गृहातच बसून चहा पिताना गप्पा मारल्या.

सर्वप्रथम त्याला म्हटलं की, तुला जे काय खायला आवडतं असेल ते मागवू काय? पण कार्यक्रमाच्या गडबडीत असल्यामुळे त्याने मला काय आवडतं ते तर सांगितलं, पण मागवलं नाही. नंतर बोलताना तो मला म्हणाला की, मी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही खातो, पण त्यातल्या त्यात मला मासे जास्त प्रिय आहेत. तेसुद्धा जिथे जास्त प्रमाणात मासे मिळतात, त्या ठिकाणी मासे खायला मजा येते. कॉलेजमध्ये असताना आमची एक मैत्रीण होती. ती वसई-विरार या भागात राहायची. तेव्हाची जी मासे खाण्याची आठवण आहे, ती कायम मनावर कोरलेली आहे. ती आठवण म्हणजे आम्ही तेव्हा ताजे मासे पकडून आणायचो आणि ताज्या माशांचे कालवण ती करायची आणि त्याबरोबर गरम भात. ज्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट ठिकाणी जायला आवडतं तसं खाण्याची काही विशिष्ट ठिकाणे असतात आणि तिथले पदार्थ आपल्याला आवडतात. कदाचित त्या पदार्थांच्या चवीपेक्षा जास्त चविष्ट पदार्थ दुसरीकडे असतीलसुद्धा, पण आपल्याला त्या विशिष्ट ठिकाणी तो पदार्थ आवडतो. याला कारणीभूत ती जागा, तिथले वातावरण किंवा पदार्थ वाढणारा एखादा विनयशीयल माणूस. अशी भरपूर ठिकाणं माझ्या आवडीची आहेत. देशात आणि विदेशातसुद्धा.

गाण्याच्या बाबतीत म्हटलं तर सलीलला कोल्हापूरच्या केशवराव भोसले सभागृहात आणि सांगलीच्या विष्णुदास भावे सभागृहात जायला विशेष आवडतं. कारण त्याच्या शब्दांत सांगायचं तर तो म्हणतो, तिथे इतकी मोठमोठी मंडळी गाऊन गेली, त्या सगळ्याचा आभास मला तिथे होतो. त्यामुळे गाताना एक वेगळी मजा येते. ‘‘खाण्याशी संबंधित एखादी विशेष आठवण आहे काय?’’ असं विचारल्यावर सलील म्हणाला, ‘‘हो! आणि ती नागपूरशी निगडीत आहे. एकदा दूरदर्शनवरील कार्यक्रमात जजिंग करत असताना ‘‘चाल आधी की गाणं आधी?’’ असा प्रश्न असताना मी त्यांना उदाहरण दिलं. ‘पोळी आधी की फोडणीची पोळी आधी?’ ही गोष्ट नागपूरच्या बाईंनी लक्षात ठेवली. नंतर नागपूरला कार्यक्रमानिमित्त आलो असताना त्या बाईंनी कल्हई केलेल्या जुन्या पितळी डब्यात भरपूर फोडणीची पोळी माझ्याकरिता आणली. चांगलं खाण्यासाठी मला कुठेही जायला आवडतं, वर्षातून एखादी फेरी तरी मी इंदूरला करतो. तिथले गराडू आणि जोशींचा दहीवडा मला फार आवडतो.

त्याला जेव्हा मी म्हटलं की, तुमचे कार्यक्रम बहुधा रात्री असतात. अशा वेळी खाण्यापिण्याच्या बाबतीत कसली काळजी बाळगता? त्यावर तो म्हणाला, रात्री कार्यक्रम संपल्यानंतर जेवायला त्रास होतो. यावर उपाय म्हणून मी वेगवेगळे पर्याय शोधत होतो. खूप प्रयोगानंतर माझ्या लक्षात आलं की, कार्यक्रमाच्या आधी 6-7 वाजताच्या दरम्यान घरगुती पद्धतीचे पोहे खाल्ले तर मला जडही वाटत नाही आणि पोटसुद्धा भरतं व कार्यक्रमानंतर जेवणाची कटकट नसते. निवांतपणे हॉटेलमध्ये झोपणे. हे सांगताना त्याला खरंच झोप आली. आम्ही विंगेत उभे राहून पाऊण-एक तास गप्पा मारत होतो हे आमच्या लक्षातही आलं नाही.

सावजी मरल करी

साहित्य – 200 ग्रॅमकांद्याचे वाटण (300 ग्रॅम कांदे तेलावर परतून त्याची पेस्ट करा), 1 वाटी आलं-लसूण पेस्ट, 8-10लाल मिरच्या, 1 चमचा बडीशेप,4-5 मोठी इलायची, 8-10 छोटी इलायची , 4-5 स्टारफूल, 2-3 दालचिनी, 2 चमचे लवंग, 1 चमचा जायपत्री,  काळी मिरी, 2-2 चमचे शहाजिरे, अर्धी वाटी धने, पाव वाटी खसखस,  2 चमचे ज्वारीचे पीठ, 1 वाटी शेंगदाणा तेल, अर्धी वाटी खोबरेल तेल, 2 चमचे तिखट, 4-5 तमालपत्र, 1 चमचा हळद, मीठ चवीनुसार, 1 नग मोठा मासा (मरल).

कृती – कांदा व लसूण सोडून सर्व मसाले लालसर, काळपट रंगात भाजून घ्यावेत व गरम पाण्यात 10 मिनिटे उकळल्यानंतर बारीक वाटून घ्यावे. पातेल्यात तेल टाकून प्रथम आलं-लसूण पेस्ट टाकून ते शिजवल्यावर कांद्याचे वाटण तसेच वरील वाटलेला मसाला व तमालपत्र घालावे. थोडेसे पाणी टाकून हे मिश्रण तेल सुटेस्तोवर उकळावे. सगळ्यात शेवटी हळद, तिखट व खोबरेल तेल टाकावे. वरुन थोडी कोथिंबीर घालावी. चवीनुसार मीठ घालावे. माशाचे तुकडे साफ करून त्याला आलं-लसूण पेस्ट व मीठ लावून ठेवा. नंतर चण्याच्या डाळीच्या पिठात घोळवून तेलावर तांबूस रंगावर तळून तयार ग्रेव्ही त्यावर ओतून खायला द्या.

तळलेली सुरमई

साहित्य – मोठय़ा सुरमईचे बेताचे तुकडे अर्धा किलो, लसूण पाकळ्या 15-20, चिरलेली कोथिंबीर 1 वाटी, तिखट 1 चमचा, धने 1 चमचा, आमसूल 4. मीठ, हळद चवीनुसार. तांदळाचे पीठ अर्धी वाटी, खोबरेल तेल पाव वाटी.

कृती – सुरमईचे तुकडे स्वच्छ धुऊन त्याला थोडं मीठ, हळद लावून ठेवावं. धने, तिखट, आमसूल, लसूण, कोथिंबीर यांची थोडं मीठ, हळद घालून बारीक गोळी वाटावी. ती तुकडय़ांना लावून ते तासभर मुरत ठेवावे. नंतर हे तुकडे तांदळाच्या पिठात दाबून घोळवावेत. खोलगट तव्यावर खोबरेल तेल रिफाइंड तेलात तळावेत.

राजभोग दहीवडा

साहित्य –  2 वाटय़ा उडदाची दाळ भिजवून वाटलेली (उडदाची डाळ 2-3 तास पाण्यात ठेवून स्वच्छ धुऊन वाटून घेणे व ती डाळ थोडी घट्टसर असावी). छोटा पाव चमचा पिवळा रंग , पाव चमचा रेड ऑरेंज रंग, पाव वाटी तळलेले काजू, अर्धा वाटी किसमिस, 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, साखर. 4 वाटय़ा घोटलेले मलईचे घट्ट दही, 4 चमचे  कोथिंबीर,  1 चमचा बेकिंग पावडर.

कृती – वाटलेल्या उडदाच्या डाळीत मीठ, सोडा, तळलेल्या काजूचे तुकडे, किसमिस (मनुका) घालून छान फेटून घेणे. नंतर याचे राजभोगच्या आकाराचे गोळे करून मंद आचेवर तळून लगेच रेड ऑरेंज रंगाच्या पाण्यामध्ये घालावे. दहा मिनिटे त्यात ठेवून पाणी निथळू द्यावे. नंतर हलक्या हाताने मधून कापून दोन भाग करावे. सर्व्ह करतेवेळी मलाईच्या दहय़ात चवीनुसार मीठ, साखर घालून हे दही वडय़ांवर ओतून वरून कोथिंबीर व चाट मसाला घालून सर्व्ह करावे.

 

आपली प्रतिक्रिया द्या